Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 27 November, 2010

नितीश सरकारचा थाटात शपथविधी

पाटणा, दि. २६ : बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआला तीन चतुर्थांशापेक्षा जास्त बहुमत प्राप्त झाल्यानंतर नितीशकुमार यांनी आज सलग दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या एका शानदार समारंभात बिहारचे राज्यपाल देवानंद कुंवर यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीशकुमार यांच्यासह ३० मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यांपैकी भाजपचे सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपद बहाल करण्यात आले. शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये जदयुचे १८ आणि भाजपच्या १० मंत्र्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या विरोधी पक्षांचा एकही नेता नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभासाठी हजर नव्हता हे विशेष. या समारंभासाठी गांधी मैदानाला सुंदर पद्धतीने सजविण्यात आले होते.
नितीशकुमार यांनी आपले निकटवर्ती आणि जदयु प्रदेशाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांच्यासह लालूप्रसाद यादव यांची साथ सोडून जदयुत आलेल्या रमई राव व श्याम रजाक यांना कॅबिनेट मंत्री म्हणून सामील करून घेतले. याशिवाय विजेंद्रप्रसाद दावय, नरेंद्र नारायण यादव, नरेंद्र सिंग, ब्रिशेन पटेल, रेणू कुमारी, जितनराम माझी, गौतम सिंग, दामोदर राऊत, शाहीद अली खान व हरीप्रसाद साह या गेल्यावेळच्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे सुपुत्र नितीश मिश्रा, विधानपरिषदेचे ज्येष्ठ सदस्य भीमसिंग, अवधेशकुमार कुशवाहा आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ व माजी ऍडव्होकेट जनरल पी. के. साही यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
भाजपच्या मंत्र्यांमध्ये सुशीलकुमार मोदी यांच्याव्यतिरिक्त नंदकिशोर यादव, अश्विनीकुमार चौबे, प्रेम कुमार, गिरिराज सिंग, जनार्दन सिग्रीवाल या जुन्या मंत्र्यांसह सुखदा पांडे, सुनीलकुमार पिंटो, सत्यदेव नारायण आर्य आणि रामाधर सिंग या नव्या चेहेऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजीवप्रताप रुडी, राजथानसिंग, अनंतकुमार आणि "शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा प्रामुख्याने उपस्थित होते. जदयु अध्यक्ष शरद यादव, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा आणि बिहारमधील लोकसभा व राज्यसभेचे अनेक सदस्यदेखील शपथविधी समारंभास हजर होते.

No comments: