Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 November, 2010

शिरगावला वाचवण्यासाठी आता थेट जयराम रमेश यांना साकडे

लढा व्यापक करण्याचा शिरगाववासीयांचा निर्धार
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) मार्फत राज्यातील विविध खाण प्रभावित क्षेत्रांचा पर्यावरणीय परिणाम अहवाल (ईआयए) तयार करण्याची केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी शिफारस केली होती. या शिफारशीला राज्य सरकारकडून कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली आहे. "नीरी' कडून शिरगावातील खाणींबाबत केलेल्या पाहणीत गंभीर चिंता व्यक्त करूनही त्याकडे साफ दुर्लक्ष करून खाण खात्याने "मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनी' च्या "लीझ' कराराचे नूतनीकरण केल्याने शिरगाववासीय बरेच भडकले आहेत. याप्रकरणी खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची तक्रार थेट जयराम रमेश यांच्याकडे करण्याचा निर्णय शिरगावातील ग्रामस्थांनी घेतला आहे.
शिरगावातील अमर्याद खाण व्यवसायामुळे हा गाव सध्या अस्तित्वच गमावण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण शिरगावलाच खाण व्यवसायाने वेढा घातला असून येथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत समूळ नष्ट होण्याची भीती आहे. गावातील बहुतांश विहिरींचे पाणी आटल्याने ग्रामस्थांसमोर गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खाण माती शेतात वाहून आल्याने शेतीही नष्ट झाली आहे. आता "मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनी' ला तब्बल ९६ हेक्टर जागेत खनिज उत्खननासाठी परवाना दिल्याने हा गावच नष्ट होण्याच्या दहशतीने येथील ग्रामस्थ जागृत झाले आहेत.
दरम्यान, काही काळापूर्वी शिरगावातील या गंभीर समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी "नीरी' तर्फे या गावची पाहणी करून खाण उद्योगामुळे गावावर ओढवलेल्या गंभीर नैसर्गिक संकटाचा स्पष्ट अहवालही तयार करण्यात आला होता. या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करून व केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्र्यांच्या शिफारशींना वाकुल्या दाखवून खाण खात्याने "लीझ' कराराचे नूतनीकरण केल्याने ग्रामस्थांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे. राज्यात खाण धोरण निश्चित होण्यापूर्वी एकाही खाण प्रकल्पाला परवाना देणार नाही, असे जयराम रमेश यांनी १२ फेब्रुवारी २०१० रोजी मुख्यमंत्री तथा खाणमंत्री दिगंबर कामत यांना पत्र पाठवले होते. राज्यातील सर्व खाण प्रभावित क्षेत्रांचा "नीरी' मार्फत व्यापक पाहणी अहवाल तयार करण्यासंबंधी निर्देशही त्यांनी दिले होते. या सर्व गोष्टींकडे खाण खात्याने साफ दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे.
जयराम रमेश यांना निवेदन सादर करणार
शिरगावातील ग्रामस्थांनी शिरगाव बचाव अभियानाअंतर्गत खाण उद्योगाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा संकल्प सोडला असून शिरगावातील भीषण परिस्थितीची संपूर्ण माहिती विशद करणारे एक निवेदन जयराम रमेश यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनासोबत येथील भीषण परिस्थितीबाबतची छायाचित्रे तथा विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची कात्रणेही जोडण्यात येणार आहेत. बेकायदा खाणींबाबतच्या विषयावरून जयराम रमेश यांनी कडक भूमिका घेतली आहे व त्यांनी विविध राज्य सरकारांनाही याप्रकरणी फटकारल्याची उदाहरणे ताजी असताना शिरगावचा हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यास त्यातून नक्कीच काहीतरी चांगले निष्पन्न होईल, असा विश्वास या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

No comments: