Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 19 October, 2010

वाळपईत विक्रमी ८३.१० टक्के मतदान

-हळदणकर व राणेंचे भवितव्य सीलबंद
-निकालाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क
२१ रोजी निकाल

पणजी, वाळपई दि. १८ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघासाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत ८३.१० टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून त्याचा निकाल येत्या २१ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत झालेल्या या मतदानात मुरमूणे या मतदान केंद्रात सर्वांत जास्त म्हणजे ९३.४४टक्के तर, वाळपई ५(अ) या मतदान केंद्रावर सर्वांत कमी ६४.३७ टक्के एवढे मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
एकूण १७ हजार ९२० मतदारापैंकी १४ हजार ८८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावला. यात ७ हजार ६६४ पुरुष तर, ७ हजार २२० महिलांनी मतदान केले.
सकाळी ८वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मतदानासाठी काही मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते. यात महिला मतदारांच्या रांगा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात बंदूकधारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आले होते.
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विश्वजित राणे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी २७ जुलै रोजी राजीनामा दिल्याने आज घेण्यात आलेल्या या पोट निवडणुकीत अनेकांनी या प्रकाराचा धिक्कार करून मतदान केले. ब्रम्हकरमळी या भागात मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या लोकांना प्रतिक्रिया विचारली असता खाणीचे समर्थन करणाऱ्या उमेदवाराला आम्ही कदापिही मतदान करणार नाही, असेच अनेकांनी सांगितले. ही निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचेही अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणी वेळीच धक्कादायक चित्र स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे संगणकाद्वारे छायाचित्र घेतले जात होते. त्यानंतर अंगठ्याचा ठसा घेऊनच मतदान करण्याची परवानगी दिली जात होती. बोगस मतदान टाळण्यासाठी अशा प्रकारची पहिल्यांदाच काळजी घेण्यात आली होती. एका मतदाराचे छायाचित्र आणि अंगठ्याचा ठसा घेण्यासाठी एका मिनिटाचा अवधी लागत होता. सकाळपासूनच वाळपईत पावसाची रिपरिप सुरू होती. तरीही मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. अनेक मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी वाहनांचीही सोय ठेवण्यात आली होती. सकाळपासूनच दोन्ही उमेदवार मतदान केंद्रावर फिरताना दिसत होते. अनेक मतदान केंद्रावर दुपारी २.३० पर्यंत ५० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
धावे प्राथमिक विद्यालयात मतदान केंद्रावर दुपारी जेवणाचा वेळ असूनही महिला मतदारांची मोठ्या संख्येने रांग पाहायला मिळत होती. सत्तरी युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारीही गाड्या घेऊन मतदान केंद्राच्या आसपास फिरत असल्याचे दिसत होते. ""विश्वजित राणे यांनी मंदिरे बांधण्यासाठी पैसे दिले आहेत. मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत. खाणींना आमचा विरोध नसला तरी, बेकायदेशीर सुरू असलेल्या खाणी बंद झाल्या पाहिजेत'' अशी प्रतिक्रिया गुळेलीचे जिल्हा पंच सदस्य हुमलो टी. गावडे यांनी व्यक्त केली. या मतदान केंद्रावर दुपारी १२ पर्यंत ५९० मतदारांपैकी ३३६ मतदारांनी मतदान केले होते.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस हे जातीने याठिकाणी लक्ष ठेऊन होते. सायंकाळी मतदानानंतर मतदान यंत्र कडक पोलिस पहाऱ्यात पणजी येथील होम सायन्स महाविद्यालयात हलवण्यात आल्या.
ज्येष्ठ मतदार यशवंत रामकृष्ण गाडगीळ
परवान्याचे नूतनीकरण करण्यांसाठीच लादलेली ही निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहिलेली नाही. लोकांचा पाठिंबा पैशांना आहे. लोक पैसे घेऊन मतदान करीत आहेत. पैशांच्या बळामुळे सत्ताधारी पार्टीचाच जोर पाहायला मिळतो. वडील चांगले होते पण, विश्वजित राणेंचे हे राजकारण खतरनाक असून यापूर्वी असा प्रकार वाळपईत कधीच पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया १९५१ पासून मतदानात मतदान करणारे श्री. गाडगीळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील नारायण राणेंचा मुलगा काय आणि या राणेंचा मुलगा काय सर्व एकच, अशी तिखट टिपणीही त्यांनी यावेळी केली.
विश्वजित राणेंची सावध भूमिका
प्रचार न करता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची आपण अनामत रक्कम जप्त करणार असल्याची डरकाळी फोडणारे कॉंग्रेस उमेदवार विश्वजित राणे यांना भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांनी अक्षरशः घाम काढला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना विश्वजित राणे यांनी आपणास विजयाची खात्री असल्याचा दावा करताना, निश्चित किती मताधिक्याने जिंकू हे सांगण्यास नकार दिला.
खाणीचा मुद्दा प्रभावी ः संतोष हळदणकर
मतदान यंत्रात सर्व काही बंद झालेले आहे. त्यामुळे येत्या २१ रोजी चित्र स्पष्ट होणार आहे. लोकांनी मला उदंड प्रतिसाद दिला. खाण विरोधाचा मुद्दा बराच प्रभावी ठरला असल्याचेही यावेळी श्री. हळदणकर यांनी सांगितले. खाणीला विरोध करणाऱ्याबरोबर आपण सतत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments: