Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 October, 2010

केंद्राकडून कॉमन 'वेल्थ'ची सामूहिक लूट

पंतप्रधानांचे कार्यालयही गुंतल्याचा भाजपचा आरोप
भाजप पक्षाध्यक्ष नितीन गडकरींचे टीकास्त्र
-महाघोटाळ्‌याची"जेपीसी'मार्फत चौकशी करा!
-संपूर्ण मंत्रिमंडळच भ्रष्टाचाराच्या छायेत
-बजेटची "कोटीच्या कोटी' उड्डाणे कशी?
-पंतप्रधानांच्या डोळे झाकून स्वाक्षऱ्या?
-घोटाळ्‌याचा पैसा स्वीस बॅंकेत जमा
-भ्रष्ट मंत्र्यांबद्दल पंतप्रधानांचे विचार कळावेत

नवी दिल्ली, १९ (प्रतिनिधी): "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे'च्या आयोजनात, पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यात महाघोटाळा झाला. या महाघोटाळ्यात पंतप्रधान कार्यालय आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळच गुंतलेले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या महाघोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत(जॉईट पार्लमेंटरी कमिटी­-जेपीसी) चौकशी करायलाच पाहिजे,' अशी जोरदार मागणी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. ११, अशोका मार्गावरील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित या भरगच्च पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. या महाघोटाळ्यातील कथित राजकीय व्यक्तींच्या सहभागाची चौकशी होणे गरजेचे आहे. कोणताही उशीर न करता या घोटाळ्यातील दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे, असेही गडकरी म्हणाले.
"राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात जो महाभ्रष्टाचार झाला, त्याला थेट पंतप्रधान जबाबदार नाहीत? राष्ट्रकुलसंबंधी निधी देताना ज्या दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, त्याची शहानिशा पंतप्रधानांनी केली होती?' असे प्रश्न उपस्थित करत गडकरी यांनी या स्पर्धेच्या आयोजनात थेट पंतप्रधान कार्यालय आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळच गुंतले असल्याचा आरोप केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात प्रारंभी १८९९ कोटी रुपयांचे बजेट होते. मात्र, हे बजेट शेवटी ७० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. आयोजन समितीला स्पर्धेसाठी पैसा जारी करताना पंतप्रधान ज्या दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या करत गेले, त्या दस्तावेजांच्या वास्तविकतेची शहानिशा त्यांनी स्वाक्षऱ्या करण्यापूर्वी केली होती का? असा सवाल करीत गडकरी यांनी या महाघोटाळ्यातील तथ्यं उजेडात आणण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांच्या नेतृत्वात एका उच्चाधिकार समन्वय समितीची नियुक्ती करावी, अशी मागणीही केली.
""राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भ्रष्टाचारात गुंतलेल्या राजकारण्यांची, तसेच सर्वच मंत्र्यांची चौकशी व्हायला पाहिजे व महाघोटाळ्याची सर्वांगीण चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करायला पाहिजे. या महाघोटाळ्याशी संबंधित जे ठोस पुरावे भाजपाने गोळा केलेले आहेत, ते संयुक्त संसदीय समितीसमोर ठेवले जातील,'' असे गडकरी म्हणाले. "या चौकशीत पंतप्रधान कार्यालयाचीही चौकशी व्हायला पाहिजे का,' या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, "स्पर्धेशी संबंधित पैसा देण्याच्या कागदपत्रांवर पंतप्रधान कार्यालयानेच स्वाक्षऱ्या केल्या असल्याने स्वाभाविकपणे पंतप्रधान कार्यालयाचीही चौकशी व्हायलाच पाहिजे. कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, कपिल सिब्बल, अजय माकन, जितीन प्रसाद हे आयोजन समितीचे सदस्य असल्याने ते सुद्धा जबाबदार आहेत, असेही गडकरी म्हणाले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची विश्वसनीयता संपूर्ण देशालाच माहीत आहे. सुरेश कलमाडी हे काय आहेत आणि त्यांनी काय काम केले आहे, हे कॉंग्रेस पक्षातील प्रत्येकालाच माहीत आहे. कलमाडींच्या सल्ल्याने, सांगण्याने पंतप्रधानांनी निधी जारी केला का? आणि निधी जारी करण्यापूर्वी नियमांची पूर्तता केली गेली का? पंतप्रधानांनी याची शहानिशा केली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी गडकरी यांनी केली.
यावेळी गडकरी यांनी पंतप्रधानांनाच थेट सवाल केले. "राष्ट्रकुलमधील या महाघोटाळ्याला तुम्ही जबाबदार नाही? तुम्ही खर्च आणि अंदाजाची योग्य शहानिशा न करताच आयोजन समितीच्या सांगण्यानुसार अतिरिक्त बजेट वाढवून दिले. तुम्ही जर असे केले नसते तर भ्रष्टाचाराला वेसण बसले असते. आता तुमचे मंत्री, कॉंग्रेसचे नेते, दिल्लीच्या मुख्यमंत्री भ्रष्ट अधिकाऱ्यांविषयी बोलत आहेत. परंतु, भ्रष्ट मंत्र्यांबद्दल तुमचे काय विचार आहेत? हे जरा कळू द्या,' असे गडकरी म्हणाले.
राष्ट्रकुल स्पर्धांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याची आमची मागणी पंतप्रधान मान्य करतील, असा विश्वास आणि आशा आम्हाला आहे. मात्र, आमची ही मागणी मान्य न केल्यास भाजपा ९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वादळ निर्माण करेल, असा इशाराही गडकरी यांनी यावेळी दिला.
राष्ट्रकुलमधील भ्रष्टाचार मॉरिशसमार्गेही झाला आणि ओळख उघडकीस येऊ नये, यासाठी पैसा स्वीस बॅंकेत जमा झाला, हे पंतप्रधानांना ठाऊक आहे का? भ्रष्टाचाराचा पैसा स्वीस बॅंकेत जमा होण्याचा हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. आणि पंतप्रधान आपल्याला जणू काहीच माहीत नसल्याचे भासवत आहेत, असा प्रहारही गडकरी यांनी केला.
...आणि मनीष तिवारी भडकले
कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गडकरींवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यात अडकण्याची शक्यता असल्यामुळेच गडकरींनी पंतप्रधानांवर आरोप केले, असेही तिवारी म्हणाले. दरम्यान, एका पत्रकाराने, चौकशीची सुरुवात भाजपाचे मित्तल यांच्यापासूनच का? कलमाडी किंवा शीला दीक्षितांपासून का नाही? असे प्रश्न विचारताच तिवारी संतप्त झाले आणि ते पुन्हा भाजप कार्यकर्त्यांवर घसरले.

No comments: