Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 October, 2010

‘इफ्फी' समितीवरील लाभार्थी पदाधिकाऱ्यांना तात्काळ हटवा

ऑगी डिमेलो यांची मुख्य सचिवांकडे तक्रार
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): 'इफ्फी' आयोजनाच्या विविध कंत्राटांत प्रत्यक्ष लाभार्थी व्यक्तीचीच गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवर नेमणूक करणे व त्यात निविदा समितीवरही त्यांचा सहभाग असणे म्हणजे केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उघडपणे उल्लंघन ठरते. रंजना साळगावकर, अंजू तिंबलो व फ्रान्सिस्को मार्टिन्स हे प्रत्यक्ष "इफ्फी' आयोजन कंत्राटात लाभार्थी असून त्यांनी तात्काळ आपल्या पदांचा राजीनामा द्यावा अन्यथा या व्यक्तीशी संबंधित हॉटेल व इतर उद्योगांना निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी गोमंतकीय चित्रपट निर्माते व तियात्र कलाकार ऑगी डिमेलो यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांना केलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
ऑगी डिमेलो यांनी आपल्या निवेदनात केंद्रीय दक्षता आयोगाने ७-१२-२००५ साली जारी केलेल्या आदेशाची प्रत सादर करून एखाद्या उद्योगात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हित असलेल्या व्यक्तीने निविदा समितीत सहभागी न होण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याचेच दाखवून दिले आहे. तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रही या सदस्यांना द्यावे लागते. "इफ्फी' मुळे गोव्यातील चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळेल अशी अपेक्षा होती परंतु या महोत्सवाचा उपयोग आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी काही लोक करीत असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या खास मर्जीतील या लोकांना ते राजकीय अभय देत असल्याची टिकाही यावेळी डिमेलो यांनी केली.पूर्वीच्या समितीच्या सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावावर घोटाळा केला व सध्याचे सदस्य हॉटेल उद्योजक असल्याने त्यांनीही कंत्राटे मिळवण्यासाठी क्लृप्त्या लढवल्या आहेत."इफ्फी'आयोजनात चित्रपट उद्योगाशी संबंधित लोकांना डावलण्यात येते.लक्ष्मीकांत शेटगावकर यांना केंद्र सरकारच्या समितीत स्थान मिळते पण राज्य सरकार मात्र त्याचा विचार करू शकत नाही हे दुर्दैव असल्याचेही श्री.डिमेलो यांनी म्हटले आहे.संपूर्ण प्रशासकीय समितीचे पुनर्गठण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांचीही उचलबांगडी करावी,अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान,माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीनुसार २००४ ते २००९ या काळात न वापरलेल्या खोल्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यात एका "सिदाद दी गोवा' या हॉटेलवर एक कोटी रुपयांहून जास्त खर्च करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.प्रशासकीय समितीच्या सदस्य अंजू तिंबलो या "सिदाद दी गोवा' च्या व्यवस्थापकीय संचालक आहेत तर आयोजन समितीच्या अध्यक्ष रंजना साळगावकर या हॉटेल मेरियटच्या मालक असल्याचे सांगण्यात आले आहे. सजावटीचे कंत्राट मिळवणारे फ्रान्सिस मार्टीन्स हे देखील प्रशासकीय समितीचे सदस्य असल्याचेही श्री.डिमेलो यांनी म्हटले आहे.
या दिल्ली भेटीचे प्रयोजन काय?
गोवा मनोरंजन संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव व संस्थेच्या अध्यक्षांचे विशेषाधिकारी श्रीपाद नाईक हे आज तात्काळ दिल्लीला रवाना झाले आहेत. हॉटेल निविदेवरून निर्माण झालेला घोळ व ऐनवेळी सामंजस्य करारात किनारी हॉटेलाची अट लादण्यात आल्याने सर्वत्र टीकेची झोड उडाल्याने ही अट काढून टाकण्याच्या हेतूने हे दोघे अधिकारी दिल्लीत गेल्याची चर्चा सुरू आहे.दरम्यान, दिल्लीत सध्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा बराच गाजत असताना यापुढे "इफ्फी'आयोजनातील घोटाळ्यांचाही बराच गाजावाजा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

No comments: