Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 June, 2010

मान्सून केरळमध्ये दाखल!

पुणे, दि. ३१ - मध्यंतरी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आलेल्या "लैला' वादळामुळे मान्सूनची प्रगती थंडावणार का, अशी चर्चा सुरू असतानाच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या सूत्रांनी ही माहिती दिली. त्यानंतर मुंबई आणि पाठोपाठ गोव्यात मान्सूनचे आगमन होईल, अशी अपेक्षा आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ते कायम राहिल्यास महाराष्ट्रासह गोव्यातही मान्सूनचे आगमन ठरल्या वेळेत होईल. दरवर्षी २० मे रोजी अंदमान-निकोबार बेटावर येणारा मान्सून यंदा १८ मे रोजी अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला होता. गेल्या चार पाच वर्षांपासून मान्सूनचे आगमन वेळापत्रकाअगोदर होऊ लागले आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात देशात ९८ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या शुभवर्तमानामुळे प्रामुख्याने बळिराजा सुखावला आहे. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे देशातील धान्योत्पादन घटले होते व त्याचा परिणाम सध्याच्या महागाईच्या रूपाने साऱ्या देशाला भोगावा लागत आहे. यावेळी तसे होणार नाही, अशी अपेक्षा देशवासीय बाळगून आहेत. त्याखेरीज मान्सूनमुळे देशावर आलेले पाणीटंचाईचे सावटही बऱ्याच अंशी कमी होईल, असे मानले जात आहे. शिवाय पावसामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या देशवासीयांना दिलासा मिळेल तो वेगळाच. म्हणूनच सध्या सारा देश चातकाप्रमाणे पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे.

No comments: