Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 June, 2010

'त्या'अबकारी अधीक्षकाच्या मुंबई निवासस्थानावर छापे

-दोन दिवसांची कोठडी
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): 'सीबीआय'ने डिचोली येथे पकडलेल्या केंद्रीय अबकारी अधीक्षक ए एस. पाटील याला आज प्रथम वर्ग न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. तर, मुंबई येथील त्याच्या घरावर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आज "सीबीआय'चे अधीक्षक एस एस. गवळी यांनी दिली. या प्रकरणात एक "रॅकेट' सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच, त्याच्याबरोबर अन्य अधिकारीही भ्रष्टाचारात गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काल सकाळी होंडा भागातील एका भंगाराची विक्री करणाऱ्या कंत्राटदाराकडून तक्रार मिळताच दुपारी तीनच्या दरम्यान "सीबीआय' ने सापळा रचून त्या अधीक्षकाला रंगेहाथ ताब्यात घेतले होते. तसेच, त्या तक्रारदार कंत्राटदाराकडे लाच म्हणून १८ हजार रुपये देण्याची करण्यात आलेल्या मागणीची "रेकॉर्डिंग'ही सीबीआयला मिळाली आहे. अनेकवेळा या कंत्राटदाराला पैसे देण्यासाठी अधीक्षक पाटील याच्याकडून धमकी दिली जात होती, अशी माहिती श्री. गवळी यांनी दिली.
तक्रारदार हा डिचोली येथील काही कंपन्यांकडून भंगार घेऊन तो शेजारील राज्यात नेऊन त्याची विक्री करतो. त्यामुळे तो ट्रक डिचोली चेक नाक्यावरून न्यावा लागतो. हा ट्रक सोडण्यासाठी प्रत्येकी टन मागे एक हजार रुपये देण्याची मागणी या अधीक्षकाने केली होती. दि. २ मे रोजी त्याला पैसे दिले नसल्याने त्याने त्या दिवशी तो भंगार घेत असलेल्या कंपनीला दूरध्वनी करून त्याला ट्रक खाली करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे अखेर कंटाळून त्याने बांबोळी येथे असलेल्या "सीबीआय'ल तक्रार केली. काल दुपारी त्याचा ट्रक भंगार घेऊन जाणार होता. यावेळी त्याला लाच पैसे देण्यासाठी गेले असता "सीबीआय"ने सापळा रचून त्याला अटक केली.
-------------------------------------------------------
तक्रारी नोंदविण्याचे जनतेला आवाहन
गोव्यात केंद्रीय सरकारचा अधिकारी किंवा अन्य कोणी कर्मचारी लाच मागत असल्यास त्याची तक्रार "सीबीआय'कडे करण्याचे आवाहन श्री. गवळी यांनी केले आहे. तक्रार देण्यासाठी ९४२३८८४१०० किंवा २४५९९७४ क्रमांकावर संपर्क साधण्याचीही सूचना केली आहे.

No comments: