Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 30 May, 2010

"गोमंत विभूषण' पुरस्कार माझ्यासाठी अविस्मरणीय

डॉ.अनिल काकोडकर यांचे भावोद्गार
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - आपली संपूर्ण कारकीर्द गोव्याबाहेर गेली, तरीही आपल्या हातून घडलेल्या कार्याची दखल घेऊन प्रेम व जिव्हाळ्याने काठोकाठ भरलेला "गोमंत विभूषण' हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान आपल्या कुटुंबाचे मूळ असलेल्या गोव्याकडून व्हावा ही सर्वार्थाने अभिमानाची गोष्ट आहे. गोमंतकीयांनी भरभरून दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. खरेच मी या राज्यासाठी काय योगदान देऊ शकतो, असे कृतज्ञतामयउद्गार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी पहिला गोमंत विभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर काढले.
गोवा राज्य कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित गोमंत विभूषण पुरस्कार सोहळा आज कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. पश्चिम बंगालचे राज्यपाल तथा राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे माजी अध्यक्ष एम. के. नारायणन यांच्या हस्ते डॉ. काकोडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंग राणे, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, लोकसभा खासदार फ्रान्सिस सार्दीन, राज्यसभा खासदार शांताराम नाईक व मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हजर होते.
घोडेमोडणी पथकाने नृत्य व खास पारंपरिक ढोल ताशाच्या मिरवणुकीने तरंगाचा छत्राखाली डॉ.काकोडकर यांना व्यासपीठावर आणण्यात आले. श्री. नारायणन यांनी शाळ, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला; तर मुख्यमंत्री कामत यांनी त्यांना खास तयार करण्यात आलेले मानपत्र बहाल केले. गोमंत विभूषण पुरस्काराचे मानचिन्ह या नात्याने गोमंतकीय दिवजांची आकृती असलेली भव्य समई प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले.
या भूमीने आत्तापर्यंत अनेक रत्ने देशाला दिली आहेत व यापुढेही ती चालूच राहतील. कोणतेही यश हे एका व्यक्तीचे नसून सांघिक कार्याचे असते. आपल्या यशात आपल्या संघ सहकाऱ्यांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे. या संघाचे नेतृत्व आपल्याकडे होते व त्यामुळेच या यशाचा मानकरी आपण ठरलो,असे प्रांजळ मतही यावेळी डॉ.काकोडकर यांनी व्यक्त केले.
अमेरिकेबरोबर केलेल्या अणुकराराबाबत बोलताना ते म्हणाले, या कराराचे दृश्य परिणाम आणखी काही वर्षांनंतर दिसून येतील. विकासाची गती कायम राखण्यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज भासणार आहे. या करारामुळे भारत पुढील गरज भागवण्यासाठी स्वयंपूर्ण असेल. आपल्या कार्याशी आपण प्रामाणिक राहणेच पसंत करतो, असेही ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे या नात्याने हजर असलेले पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के.नारायणन यांनी आपल्या भाषणात डॉ.काकोडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. अणुशक्ती धारण करणारा शक्तिशाली देश अशी भारताला मिळालेली जागतिक पावती हे त्यांच्या कार्याचे फलित असल्याचे ते म्हणाले. अणुकरारावेळी अमेरिकेशी झालेली चर्चा व भारताचे सर्व अधिकार अबाधित ठेवून हा करार करण्यात मिळालेले यश हा त्यांची मुत्सद्देगिरी व कठोर प्रशासन यांचा विजय असल्याचेही श्री.नारायणन म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी डॉ.काकोडकर यांच्या सेवेचा या राज्यालाही काही प्रमाणात लाभ व्हावा,अशी इच्छा व्यक्त करून गोव्याच्या ऊर्जा भवितव्याचे धोरण ठरवण्यासाठी त्यांनी सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा विद्यापीठ व राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था यांच्या सहकार्याने गोव्यातही एखादे संशोधन केंद्र उभारता येणे शक्य आहे का, याचाही अभ्यास करावा,अशी सूचनाही कामत यांनी केली. डॉ.काकोडकर हे पहिले गोमंत विभूषण ठरल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे व ती अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी राहील, असा शब्दही कामत यांनी दिला.
याप्रसंगी खासदार शांताराम नाईक, फ्रान्सिस सार्दिन, प्रतापसिंग राणे व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही आपले विचार मांडले. मुख्यमंत्री कामत यांनी डॉ.काकोडकर यांच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर, पत्नी श्रीमती सुयेशा काकोडकर व भगिनी श्रीमती सुषमा गांगल यांचाही यावेळी गौरव केला. सुरुवातीस प्रवीण गावकर व साथीदार यांनी मनोहरराय सरदेसाई यांचे मराठीतील सुंदर गीत सादर करून सभागृहातील वातावरण प्रसन्न केले. कला व संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत केले. उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. नारायण देसाई यांनी सूत्रसंचालन केले. राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी आभार मानले.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाचे सकाळी "इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ. के.कस्तुरीरंगन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक डॉ.सतीश शेटये व मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हजर होते. नंतर ज्ञानेश मोघे यांनी तयार केलेला डॉ. अनिल काकोडकर यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवणारा "कर्मयोगी' हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. डॉ. अजय वैद्य यांनी डॉ. काकोडकर व त्यांच्या कुटुंबीयांची घेतलेली प्रकट मुलाखत उत्तरोत्तर बहरली. "विज्ञान व समाज' या विषयावरील परिसंवादही रंगला. या परिसंवादात डॉ.अनिल काकोडकर यांच्यासह भाभा संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीकुमार बॅनर्जी, संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजयकुमार सारस्वत, "एनआयओ'चे संचालक डॉ. सतीश शेट्ये, "इस्रो'चे माजी अध्यक्ष डॉ.के.कस्तुरीरंगन व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रवी ग्रोव्हर यांनी भाग घेतला.

No comments: