Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 31 May, 2010

मिनिबसच्या धडकेने पादचारी ठार

दाबोळी विमानतळाकडून थोड्याच अंतरावर असलेल्या महामार्गावर एक अज्ञात इसम रस्ता ओलांडत असताना त्यास मिनिबसने ठोकर दिल्याने तो पादचारी अपघातात ठार झाला. आज दुपारी अपघातात मरण पावलेल्या या व्यक्तीची उशिरा रात्रीपर्यंत ओळख पटलेली नसून सदर मयत इसम चाळीस वर्षाच्या आसपास असल्याची शक्यता वास्को पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. दाबोळी विमानतळाच्या दिशेतून वेर्णा येथे जात असलेल्या मिनिबसच्या (क्रः जीए ०१ टी ९४६९) मध्येच एक अज्ञात पादचारी आल्याने बस चालकाचा ताबा स्टिअरिंगवरून सुटून त्याने त्याला धडक दिली. मिनिबसच्या धडकेमुळे गंभीररीत्या जखमी झालेल्या या अज्ञात पादचाऱ्याला यावेळी त्वरित बांबोळीच्या गो.मे.कॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले असता येथे पोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरकडून घोषित करण्यात आले. त्या अज्ञात मयताच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो सध्या बांबोळीच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे.
धडक दिलेली बस एका हॉटेलसाठी चालत असल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली. बसचालक दीपक गीर (राः खोर्ली, म्हापसा) यास ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

No comments: