Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 June, 2010

'पंचवाडी बचाव समिती'ला सलाम!

जागतिक पर्यावरणदिन विशेष
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उद्या ५ रोजी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन जरी केले असले तरी फोंडा तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व विश्व रचनाकाराची खास मेहरनजर प्राप्त झालेल्या पंचवाडीवासीयांसाठी मात्र या दिनाचे वेगळेच महत्त्व आहे. नियोजित खाण प्रकल्पाच्या विळख्यातून आपल्या गावचे सौंदर्य व पर्यावरणीय संपत्ती जतन करण्यासाठी गेली अनेक वर्षे हे भूमिपुत्र अविरतपणे झटत आहेत. या लढ्यात पंचवाडीवासीयांना पर्यावरणवाद्यांचे समर्थन प्राप्त जरी झाले असले तरी राजकीय पातळीवर पंचवाडीवासीयांत दुफळी माजवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निसर्गाशी अतूट नाते जोडलेल्या पंचवाडीवासीयांना सत्ता व पैशांच्या जोरावर वेगळे करण्यासाठी हरतऱ्हेच्या प्रयत्नांची शिकस्त खाण कंपनीकडून सुरू आहे पण पंचवाडी बचाव समितीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने या संकटाला तोंड देत आहेत ते पाहता पर्यावरणदिनाच्या या निमित्ताने त्यांच्या लढ्याला सलाम करावाच लागेल.
केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने यंदा या दिनानिमित्त " जैविक विविधता - निसर्गाशी नाते' असा मंत्र दिला आहे. सामाजिक, राजकीय तथा शैक्षणिक स्तरावर हा दिवस साजरा होईल. पर्यावरणाच्या रक्षणार्थ विविध स्पर्धा, चर्चासत्रे, परिसंवाद होणार आहेतच. अनेक ठिकाणी पर्यावरणवाद्यांकडून जनजागृती होईल. काही कार्यक्रमांसाठी आपले राजकीय नेतेही हजर असतील व पर्यावरण रक्षणाचे धडे ते सर्वसामान्य लोकांच्या गळी उतरवतील. गोव्यात खास करून खाण व्यवसायाने पर्यावरणाचा गळा घोटला आहे व त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आत्तापासूनच जाणवायला लागले आहेत. पर्यावरणाशी खरे नाते असलेले व पारंपरिक पद्धतीने पर्यावरणाचे जतन करणारे अनुसूचित जमातीचे बांधव व इथले भूमिपुत्र खाण व्यवसायामुळे विस्थापित होण्याच्याच मार्गावर आहेत. काणकोण, सांगे, सत्तरी, केपे, डिचोली आदी तालुक्यात पर्यावरणाची कशी नासाडी सुरू आहे याचीच ओळख या दिनाच्या निमित्ताने करून देणे उचित ठरले असते. शेती हा पंचवाडीवासीयांचा मुख्य व्यवसाय पण त्यांना ट्रक व इतर व्यवसायाचे आमिष दाखवून पैसे कमावण्याची आमिषे दाखवली जात आहेत. अजून खनिज प्रकल्प यायचाच आहे पण एव्हानाच गावातीलच काही लोक अलिशान गाड्यांतून फिरताना दिसत आहेत व खनिज प्रकल्प आल्यास गावचा कायापालट होईल व गावचा विकास होईल, अशी भाषा ते बोलू लागले आहेत. आपल्या या भरकटलेल्या बांधवांची समजूत काढून या गावच्या रक्षणार्थ पंचवाडी बचाव समितीचे कार्यकर्ते करीत असलेले काम खऱ्या अर्थाने दखल घेण्यासारखेच ठरले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत गावावर खाणीचे संकट ओढवू देणार नाही असा दृढ निश्चय त्यांनी केला आहे. या भूलथापांना बळी पडून आपल्या गावचा नाश होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. एका बड्या खाण कंपनीचा व राजकीय नेत्यांना रोष पत्करणे कुणालाही परवडणारे नाही, पण गेली कित्येक वर्षे समर्थपणे या दडपशाहीला तोंड देऊन पंचवाडी बचाव समितीने नियोजित खनिज प्रकल्प थोपवला आहे. गावच्या रक्षणाची व ग्रामस्थांच्या हिताची जबाबदारी असलेल्या पंचायत मंडळातील काही सदस्यांनीही गावाला विकण्याचाच घाट घातला आहे. या प्रकल्पाला ग्रामसभेची मंजुरी आहे, असे भासवण्यासाठी हरेक प्रयत्न सुरू आहेत पण गावच्या विरोधातील प्रत्येक बाबतीत दक्ष असलेल्या पंचवाडी बचाव समितीने त्यांचे सगळे डाव धुळीला मिळवले आहेत. पर्यावरणदिनानिमित्त खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षक असलेल्या पंचवाडी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांचा गौरव होणे अपेक्षित आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पर्यावरण रक्षकांच्या या लढ्याला पाठिंबा देऊन प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडली तरच हा लढा यशस्वी होईल. पंचवाडी बचाव समितीच्या धाडसाचे व जिद्दीचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

No comments: