Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 June, 2010

न्यायालयीन चौकशी कराच : मिकी

'ड्रग् व अबकारी घोटाळ्यांचीही चौकशी हवी'
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी संशयाची सुई पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याकडे वळलेली असतानाच आज या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी खुद्द त्यांनीच करून आपल्याच सरकारला आव्हान देण्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली. नादिया मृत्यू प्रकरणाचा तपास कराच, पण त्याचबरोबर ड्रग्स माफिया व अबकारी घोटाळ्यात सरकारातील नेत्याच्या मुलाचा व सग्यासोयऱ्यांच्या सहभागाचीही निःपक्षपातीपणे चौकशी करा, असा टोला हाणून त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे.
लोटली येथील तरुणी नादिया तोरादो हिच्या रॅटोल प्राशनाने झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून सध्या पर्यटनमंत्री मिकी पाशेको बरेच अडचणीत आले आहेत. पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मिकी पाशेको व नादिया हिच्या नातेवाइकांमागे सुरू झाल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. मिकी पाशेको यांची जबानी नोंदवण्यासाठी पोलिसांनी त्यांना समन्स जारी केल्याने ते बरेच संतापले आहेत. या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर मिकी पाशेको यांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सनसनाटी पत्र पाठवण्याची घटना घडली. आपल्याला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्या सरकारातील काही हितसंबंधितांनी आपल्याला बदनाम करण्यासाठीच हा कट रचल्याचा आरोप मिकी यांनी केला. नादिया ही आपली चांगल्यापैकी कौटुंबिक मित्र व आपली वैयक्तिक जवळची मैत्रीण होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. नादिया हिचा पती व तिच्या उर्वरित कुटुंबीयांनी वेळोवेळी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर व पोलिसांनाही तिने चुकून रॅटोल प्राशन केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे सांगूनही पोलिसांचे दबावतंत्र सुरूच असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. पोलिसांच्या परवानगीशिवाय गोवा न सोडण्याची नोटीस त्यांच्यासह आपल्यालाही जारी केल्याचे व आपली जबानी नोंदवण्यासाठी समन्स जारी करण्याचा प्रकार घडल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले.
या एकूण प्रकरणी पोलिसांची कार्यपद्धती पाहिल्यास ते नक्कीच कुणाच्यातरी सांगण्यावरून ही सतावणूक करीत असल्याचा आरोप करून यामुळे पोलिसांच्या कर्तबगारीवरचा विश्वासच ढळल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
या व्यतिरिक्त पोलिसांनी तात्काळ लक्ष घालण्याची गरज असलेली अन्यही काही महत्त्वाची प्रकरणे असल्याचा टोला पाशेको यांनी यावेळी हाणला. ड्रग्स माफिया व अबकारी खात्यातील कोट्यवधींचा घोटाळा ही प्रकरणेही राज्याची मोठ्या प्रमाणात बदनामी करणारी ठरली आहेत व त्यांचाही सखोल तपास व्हावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. नादिया मृत्यू प्रकरणाबरोबर ड्रग्स माफिया प्रकरणातील राजकीय नेत्याच्या मुलाचा सहभाग व अबकारी घोटाळ्यातील एका बड्या नेत्याच्या सग्यासोयऱ्यांचा वावर याचा तपास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत व्हावा, असा जोरदार टोलाच हाणून त्यांनी मुख्यमंत्री कामत यांनाच पेचात टाकले आहे.
-------------------------------------------------------
मिकींना नारळ देणार ?
नादिया तोरादो मृत्यू प्रकरणी राज्यातील विविध महिला संघटनांकडून पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत पेचात सापडले आहेत. एरव्ही मिकी पाशेको हे कामत यांच्यासाठी डोकेदुखीच ठरले होते व त्यामुळे मिकी यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यासाठी त्यांना ही आयतीच संधी चालून आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज दुपारी मुख्यमंत्री कामत यांनी अचानक राजभवनवर राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाणच आले. केंद्रातील हायकमांडकडूनही मिकी यांना नारळ देण्यास हिरवा कंदील मिळाल्याची खात्रीलायक माहिती आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी मिकी पाशेको यांच्याकडून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे याचना केली जाईल, अशी समजूत होती पण मिकी यांनी मुख्यमंत्री कामत यांना थेट पत्र पाठवून ड्रग्स माफिया व अबकारी घोटाळ्यांची गाडली जाणारी भुतेच उखडून काढून आव्हान देण्याचा प्रकार घडल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांच्यासाठी हे मोठे आव्हान बनले आहे.

No comments: