Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 31 May, 2010

ह्रद्य सोहळ्यात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान

"राज्य कला गौरव' पुरस्कारांचे शानदार वितरण
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- कला व सांस्कृतिक खात्यातर्फे देण्यात येणारे "राज्य कला गौरव पुरस्कार' आज एका ह्रद्य सोहळ्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते ५७ ज्येष्ठ कलाकारांना प्रदान करण्यात आले. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कलाकारांचा हा गौरव सोहळा पार पाडला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, कला व सांस्कृतिक संचालक प्रसाद लोलयेकर, राज्य कला विकास समितीचे उपाध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर व निवड समितीचे अध्यक्ष विशाल पै काकोडे उपस्थित होते.
कलेतून उदरनिर्वाह होत नव्हता अशा ज्या काळात ज्या लोकांनी निरंतर कलेची सेवा करून ती जोपासली त्याची दखल घेऊन आज अशा कलाकारांचा सत्कार करण्यात येत असल्याचे श्री. कामत म्हणाले. या कलाकारांनी कलेद्वारे फारशी कमाई केली नसली तरी त्यांनी गोव्यासाठी अमौलिक योगदान दिले आहे. त्यांनी कलेची आराधना केली; व्यवहार केली नाही, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
संगीत साधना करताना पुरस्कार, सत्कार यांची आस आम्ही कधीच धरली नव्हती. राज्य सरकार ग्रामीण भागातील अशा कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करते हे उल्लेखनीय असल्याचे मनोगत डॉ. फ्रान्सिस कुलासो सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने बोलताना व्यक्त केले.
मानपत्र, मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ देऊन सर्व कलाकारांना गौरवण्यात आले. सरकारने आत्तापर्यंत २९५ ज्येष्ठ कलाकारांना गौरवल्याची माहिती काकोडे यांनी दिली.
यावेळी गुरुदास नवसो नाईक (नाटक), श्रीमती. शिलावती नार्वेकर (लोकसंगीत), लुईस जो दी कलंगुट (तियात्र), मच्छिंद्र र. मांद्रेकर (संगीत), पांडुरंग धर्माजी शिरोडकर (संगीत), जेम्स फ्रान्सिस ब्रागांझा (चित्रपट), चिको डिसोझा (संगीत), आनंद दामोदर गोरे (भजन), दत्ताराम स. शेटये (छायाचित्रीकरण), बाळू पुंडी वेळीप (नाटक), श्रीमती सीता पागी (लोकसंगीत), श्रीमती हिराबाई व्ही. बाळे (हस्तकला), बाळकृष्ण जी. अय्या (चित्रकला), प्रसाद तुकाराम सावंत (नाटक), डॉ. आनंद हेदे (संगीत), ह.भ.प रामचंद्र य. परांजपे (कीर्तन), रामकृष्ण जयदेव राऊत (नाटक), जगन्नाथ डी. नारोजी (कला), मनोहर पेडणेकर (लोकसंगीत), श्रीमती. कुंदा शाबा कामत (नाटक), नरेंद्र काशिनाथ कामत (साहित्य), रामराव आर. फडते (नाटक), श्रीमती जी. म्हार्दोळकर (संगीत), श्रीमती वासंती म्हार्दोळकर (संगीत), दत्ताराम काशिनाथ गावडे (लोककला), मधुकर वेलिंगकर (नाटक), यशोदा गोविंद गावडे (लोककला), सोनू पंढरी केरकर (लोककला), पांडुरंग बाबलो गावडे (लोककला), उमेश एच. गावडे बोरकर (भजन), महादेव व्ही. गावडे (लोककला), शिवराज तुकाराम फोंडेकर (संगीत), सीरिल डी. फर्नांडिस (तियात्र), दोराते आमान्सियो फर्नांडिस (तियात्र), रामा ऊर्फ आनंद रायकर (नाटक), जॉयल मास्करेन्हस (तियात्र), आल्बर्ट रॉड्रिगीस (तियात्र), रोमानो डायस (तियात्र), आतोनियो दोरादो (तियात्र), फ्रान्सिस झेवियर आल्मेदा (तियात्र), रघुनाथ बुधाळकर (नाटक), विश्वनाथ साळगावकर (नाटक), डॉ. फ्रान्सिस्को सी. कुलासो (संगीत), आदेल्द गिर्ल्बट डिसोझा (तियात्र), बाळकृष्ण आमोणकर (संगीत), गजानन वैद्य (नाटक), आरनॉल्ड डिकॉस्टा (चित्रपट), रामनाथ गणेश नाईक (भजन), श्रीपाद नारायण दामले (संगीत), वासुदेव पी. गावस (संगीत), कायतान फर्नांडिस (संगीत), डॉ. सखाराम बी. नाडकर्णी (संगीत), सौ. नीलिमा आंगले (साहित्य), रामकृष्ण जुवारकर (साहित्य), अर्जुन कुष्टा बाबरो (लोककला), पांडुरंग एम. शिरोडकर (लोककला) यांना कला गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री. लोलयेकर यांनी आभार व्यक्त केले.

No comments: