Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 June, 2010

शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरच

केंद्राकडून अनुमती, शिवसेनेच्या गोटात सळसळता उत्साह
मुंबई, दि. २ : रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला पंतप्रधान कार्यालयातून परवानगी देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली. त्यामुळे शिवराज्याभिषेकावरून सुरू झालेला वाद संपुष्टात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच येत्या ६ जून रोजी हा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने शिवसेनेच्या गोटात प्रचंड उत्साह संचारला आहे. कारण शिवसेनेनेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा मुद्दा पोटतिडकीने मांडला होता. ही मात्रा लागू पडली आणि अखेर हा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यास केंद्र सरकारला परवानगी द्यावी लागली.
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पुरातत्त्व खात्याने मनाई केली होती. त्याविरोधात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बिगुल वाजवल्याने संघर्षाची नौबत झडण्याची चिन्हे दिसत होती. कोणत्याही परिस्थितीत हा सोहळा साजरा करणारच, असा निर्धार व्यक्त करतानाच , ६ जूनला आपण स्वत: या सोहळ्यासाठी रायगडावर उपस्थित राहणार असल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले होते.
शिवसेनेच्या या इशाऱ्याची दखल घेत, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. अखेर आज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने परवानगी दिली आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याबाबतची घोषणा केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने श्रेय उपटण्याची संधी शिवसेनेला मिळू नये, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार दरबारी आपले वजन वापरले. त्यांची विनंती केंद्र सरकारने मान्य केल्याने शिवप्रेमींचा रोष टाळण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. हा शिवप्रेमींचा विजय असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांच्या गोटातून व्यक्त करण्यात आली आहे.

No comments: