Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 June, 2010

पंचवाडीवासीयांचा रुद्रावतार; गोंधळातच ग्रामसभा तहकूब

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)- पंचवाडीच्या ग्रामसभेत नियोजित खनिज प्रकल्पाच्या समर्थनात घेतलेल्या वादग्रस्त ठरावाच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यावरून पंचवाडी बचाव समितीने आक्रमक पवित्रा घेतल्याने काल ३० रोजीची ग्रामसभा तहकूब करण्याची नामुष्की पंचायत मंडळावर ओढवली. पंचवाडीच्या अस्तित्वाला हानिकारक ठरणारा प्रकल्प अजिबात होऊ देणार नाही व त्यासाठी पंचवाडी बचाव समिती प्राणांची बाजी लावेल, असा ठाम निर्धार क्रिस्टो डिकॉस्टा यांनी बोलून दाखवला.
पंचवाडीची ग्रामसभा काल रविवारी ३० रोजी बोलावण्यात आली होती. "सेझा गोवा' च्या नियोजित खनिज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते. ग्रामसभेच्या सुरुवातीलाच मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताला मान्यता देण्याचा विषय चर्चेस घेण्यात आला. गेल्या ७ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या वादग्रस्त ग्रामसभेत पंचायत मंडळाने ग्रामस्थांचा विरोध डावलून नियोजित सेझा गोवाच्या खनिज प्रकल्पाला मान्यता मिळवणारा ठराव संमत करून घेतला होता. यावेळी संतप्त ग्रामस्थांकडून "प्रसाद' मिळणार या भयाने हा ठराव संमत करून घेतल्यानंतर तिथून पळ काढण्याचाही प्रकार घडला होता.
या बेकायदा ठरावाविरोधात पंचवाडी बचाव समितीने पंचायत संचालकांकडे तक्रार करून आता तीन महिने उलटले तरी अद्याप या प्रकरणाचा निकाल लागत नसल्याची तक्रारही समितीने केली आहे.सदर वादग्रस्त ठराव अवैध ठरवण्यापूर्वीच दुसरी ग्रामसभा बोलावून मागील इतिवृत्ताला मान्यता देण्याच्या निमित्ताने आपोआप हा ठराव पदरात पाडून घेण्याचाच डाव खेळला जात होता व तो पंचवाडी बचाव समितीने मोठ्या शिताफीने उधळून लावला, अशी प्रतिक्रिया क्रिस्टो डिकॉस्टा यांनी व्यक्त केली.
ग्रामसभेच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांनी या विषयावरून पंचायत मंडळाला कोंडीत पकडले. हा विषय पंचायत संचालकांकडे सुनावणीसाठी आहे व त्यामुळे तो चर्चेला घेऊ नये, अशी मागणी खनिज प्रकल्पाचे समर्थन करणारे काही नागरिक करू लागले. दरम्यान, खनिज प्रकल्प विरोधकांनी सदर विषय चर्चेला आलाच नसून मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताला मान्यता देण्याचाच विषय चर्चिला जात असल्याने या इतिवृत्ताला मान्यता देण्यास कडक विरोध दर्शवला. यावेळी नाझारेथ गुदिन्हो, दुर्गेश शिसाणी आदींनी एकापेक्षा एक प्रश्नांचा भडिमार सुरू केल्याने पंचायत मंडळाची दातखिळीच बसली.ग्रामसभा हाताळता येत नसेल तर ती गुंडाळा अशी मागणी केल्यानंतर तात्काळ ही मागणी मान्य करून ग्रामसभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या तीन ग्रामसभा अशाच प्रकारे गोंधळात पार पाडल्याने विद्यमान पंचायत मंडळ पंचायतीचा कारभार हाताळण्यास पात्र नसल्याने त्यांनी तात्काळ आपल्या पदांचा राजीनामा द्यावा,अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. पंचायत सचिव हे सरपंच व इतर काही पंच सदस्यांच्या साहाय्याने गोलमाल करत असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या ग्रामसभेचा त्यांनी दिलेला बनावट अहवाल निरीक्षकांच्या अहवालामुळे उघड झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

No comments: