Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 June, 2010

नादिया मृत्यूप्रकरणी तातडीने न्यायालयीन चौकशी करा : पर्रीकर

दोषी आढळल्यास मिकींवर कारवाईची मागणी
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): नादिया दोरादो या महिलेच्या मृत्यू प्रकरणी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्यावर आरोप होत असतानाच त्यांनी खुद्द आपणहून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी मागितल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वेळ न दवडता अशा चौकशीचा आदेश द्यावा आणि याप्रकरणी मिकी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. मिकी यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवलेल्या पत्रात गृह खात्याबाबत अविश्वास व्यक्त केला आहे. सरकारच्या मंत्र्यांचाच गृह खात्यावर विश्वास नसेल तर मग सर्वसामान्य जनतेने पोलिसांवर का विश्वास ठेवावा, असा खडा सवाल पर्रीकरांनी केला. एखाद्या "आयपीएस' अधिकाऱ्याकडे हे प्रकरण सोपवल्यास त्याची योग्य पद्धतीने चौकशी होऊ शकेल. केवळ "डायलॉगबाजी' करून आपल्या मंत्र्यांच्या भानगडींवर पडदा टाकण्याची सवय मुख्यमंत्र्यांनी सोडावी. मुख्यमंत्र्यांकडे निर्णय घेण्याची कुवतच नाही. त्यामुळे ते "कणाहीन' बनले आहेत. ते खरोखरच या प्रकरणाची चौकशी स्वतंत्ररीत्या करतील काय, याबाबत शंकाच आहे, असेही पर्रीकर म्हणाले.
बलात्कार, भूखंड हडप प्रकरणे, ड्रग, बेकायदा खाणी आदी अनेक प्रकरणांत मंत्री गुंतले आहेत. मुख्यमंत्री मात्र मुकाट्याने त्यांची पाठराखण करीत आहेत,असा आरोप पर्रीकरांनी केला. गृह खात्याच्या अस्थायी समितीसमोर या सर्व प्रकरणांचा जाब आपण विचारणार आहोत. संसदीय लोकशाही पद्धतीत दिलेल्या सर्व मार्गांचा अवलंब करूनच पुढील कृती निश्चित केली जाईल. ड्रग प्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिस चौकशीवर ओढलेले ताशेरे या तपासातील फोलपणा उघड करणारे ठरले आहेत.अबकारी आयुक्तांनी अलीकडेच टाकलेले छापे व त्यात उघड झालेले गैरप्रकार अबकारी घोटाळ्याला पुष्टी देणारेच ठरले आहेत. हे प्रकरण अबकारी आयुक्त पोलिसांकडे का सोपवत नाहीत, असा सवाल करून सरकारी पातळीवर प्रत्येक घोटाळा दडपण्याचेच प्रकार सुरू आहेत, असा आरोपही पर्रीकर यांनी केला. वीज घोटाळा प्रकरणी दोषींवर कारवाई होईपर्यंत व सरकार सर्व रक्कम वसूल करून घेईपर्यंत आपला लढा कायम राहील, असा निर्धारही पर्रीकर यांनी केला.
राज्यपालांना भेटणार
विद्यमान सरकारमधील अनेक भानगडी व मंत्र्यांचे विदेश दौरे याबाबत राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू यांची भेट घेऊन त्यांना या गोष्टीची कल्पना देण्यात येणार आहे. येत्या सोमवार किंवा मंगळवारी राज्यपालांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पर्रीकरांनी दिली. विरंगुळा किंवा कामाचा ताण कमी करण्यासाठी वर्षाकाठी सात-आठ दिवस कुठेतरी फिरायला जाणे वेगळी गोष्ट; पण सतत विदेशवाऱ्या करून जनतेसाठी उपलब्ध नाही हा मंत्र्यांचा प्रकार योग्य नाही. विदेशात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री व राज्यपालांना माहिती देणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांत आरोग्यमंत्री ४० टक्के तर मुख्यमंत्री २० टक्के अधिकृतपणे गोव्याबाहेर आहेत.यात अनधिकृत किंवा वैयक्तिक दौऱ्यांचा समावेश केल्यास मंत्री जास्त वेळ गोव्याबाहेरच असतात, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.

No comments: