Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 June, 2010

"त्या' नेत्याला तात्काळ डच्चू देण्याची भाजपची मागणी

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)- दक्षिण गोव्यातील एका मुलीवर बलात्कार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विद्यमान मंत्रिमंडळातील संशयित नेत्याला तात्काळ डच्चू द्यावा व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी काही काळापूर्वी गोवा ही बलात्काराची राजधानी बनत असल्याचे विधान केले होते. दुर्दैवाने या प्रकरणामुळे त्यांचे विधान खरे ठरत असल्याचा टोला भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी हाणला.
आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. आर्लेकर बोलत होते. यावेळी प्रदेश भाजप उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष मुक्ता नाईक व सरचिटणीस वैदही नाईक हजर होत्या. दक्षिण गोव्यातील सदर पिडीत मुलीवर एका नेत्याकडून बलात्कार झाल्याचा संशय असून त्यातून दिवस गेल्यानेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला व त्यातूनच हे प्रकरण उघडकीस आले, असा संशय असल्याचे श्री.आर्लेकर म्हणाले. सदर मुलीला ठाणे व नंतर चेन्नई इथे उपचारासाठी हलविण्यात आले पण काल तिचा अंत झाला,अशीही खबर पसरली आहे. या एकूण प्रकरणात विद्यमान मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांचे नाव सातत्याने घेतले जात आहे व त्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. गेले दोन आठवडे हे प्रकरण सातत्याने वृत्तपत्रांतून झळकत आहे. या प्रकरणी एका राजकीय नेत्याच्या नावाचा उल्लेख होत असताना सरकारकडून कोणताही खुलासा झाला नाही यावरून मुख्यमंत्री दिगंबर कामत हे या नेत्याला चांगलेच ओळखून असावेत, अशी शक्यताही यावेळी श्री. आर्लेकर यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री कामत यांनी कोणतीही हयगय न करता तात्काळ या मंत्र्याला पदावरून हटवावे व या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, असेही ते म्हणाले. मुळात सदर मंत्र्याने स्वतःहून राजीनामा देणेच उचित ठरेल, पण विद्यमान मंत्रिमंडळातील एकाही नेत्याकडून तशी अपेक्षा ठेवणेच दुरापास्त असल्याने कामत यांनाच आपल्या सरकारची लाज राखणे भाग पडणार आहे,असे ते म्हणाले.
भाजप पक्षातर्फे लोकशाही पद्धतीने हे प्रकरण हाताळळे जाणार आहे. सरकार या प्रकरणी काय भूमिका घेते यावरून भाजप महिला मोर्चा आपली पुढील भूमिका ठरवणार आहे. प्रसंगी राष्ट्रीय महिला आयोगाकडेही दाद मागण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती कुंदा चोडणकर यांनी यावेळी दिली. गेल्या काही काळापासून राज्यात महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे वाढीस लागली आहेत व त्यात विशेष करून राजकीय नेते व त्यांच्या मुलांचा नावांचा उल्लेख होत आहे. या प्रकरणांची चौकशी अजिबात होत नसून ही प्रकरणे दडपली जात असल्याचेही यावेळी श्रीमती चोडणकर म्हणाल्या. कामत सरकारात अशा पद्धतीचे मंत्री आहेत म्हणूनच त्यांनी कदाचित महिलांना राजकारणात न येण्याचा सल्ला दिला असावा,असा ठोसाही यावेळी लगावण्यात आला.

No comments: