पर्रीकरांची महत्त्वपूर्ण भूमिका,नरेंद्र मोदींचे मुख्य भाषण
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षातर्फे नव्यानेच स्थापन केलेल्या सुशासन विभागातर्फे येत्या ५ व ६ जून रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत भरणार आहे. "सुराज संकल्प' असा या अधिवेशनाचा मंत्र असून त्यात सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तथा मंत्री व राष्ट्रीय नेते हजर राहतील. या विभागाच्या प्रमुखपदी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची निवड झाल्यानंतर या विभागातर्फे हे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन भरवले जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण हे या अधिवेशनाचे आकर्षण ठरणार आहे.
विकासाची गंगा सामान्य लोकांपर्यंत कशी पोहचवता येईल व आत्तापर्यंत दुर्लक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत भाजप या अधिवेशनात प्रामुख्याने उहापोह करण्यात येणार आहे. सुशासन विभागाच्या कार्याला नुकतीच गती प्राप्त झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सुशासन विभागाची दिशा ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोहर पर्रीकर यांनी दिली.
ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सहकार्याने हे अधिवेशन मुंबईत भरवले जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन ५ जून रोजी होईल. याप्रसंगी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभा विरोधी पक्षनेते अरुण जेटली आदी बडे नेते या अधिवेशनासाठी खास हजर राहणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण या अधिवेशनात होईल, अशी माहिती श्री. पर्रीकर यांनी दिली. सुशासन हाच लोकशाहीचा गाभा आहे व भाजपने सुशासन व विकास हेच ध्येय नजरेसमोर ठेवून आपली राजकीय दिशा निश्चित केली आहे. सुशासनासाठी आर्थिक सुधारणांची गरज आहे. अर्थकारणात विविध संधी जनतेला प्राप्त करून देताना आवश्यक पावले सरकारकडून उचलली गेली पाहिजेत, असेही पर्रीकर म्हणाले.
उत्पादन व सेवा क्षेत्रात सरकारने आपला सहभाग कमी करावा व केवळ खाजगी क्षेत्राची एकाधिकारशाही टाळण्यासाठीच काही ठरावीक गोष्टींचा ताबा आपल्याकडे ठेवावा ही भाजपची धारणा आहे. सामाजिक पातळीवर योजना तयार करताना जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग होईल व त्यातून खऱ्या अर्थाने सुधारणा घडवून आणता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
या अधिवेशनाच्या निमित्ताने तळागाळातील सामान्य व दुर्लक्षित लोकांपर्यंत विकास पोहचवण्यासाठी कोणत्या योजना आखता येतील, याची व्यूहरचना करण्यात येणार आहे. विकासासंबंधी नवनवीन उपक्रम, पक्षाच्या जाहीरनाम्याची कार्यवाही, संघटना व कार्यकर्ते यांच्यातील संबंध कसे दृढ करता येतील आदींबाबत सखोल चर्चा अधिवेशनात केली जाईल. तसेच सुशासनाचा आराखडा तयार करून त्याला या अधिवेशनात मान्यता देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीचे राष्ट्रीय अधिवेशन भरवले जात असल्याने पर्रीकर यांची दूरदृष्टी व सुशासनाबाबत त्यांच्या कल्पना यांची ओळख राष्ट्रीय नेत्यांना होईल.
Friday, 4 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment