Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 June, 2010

न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश नादियाची पुन्हा शवचिकित्सा

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): नादिया ज्युएल तोरादो (२८) या तरुणीच्या मृतदेहावर आज सकाळी लोटली येथील चर्चमध्ये ९.४५ वा. अंतिमविधी करण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करून मृतदेह पुन्हा शवचिकित्सेसाठी ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे मयत तरुणीच्या आईने पोलिस छळवणूक करीत असल्याचा आरोप करून पोलिसांच्याविरुद्ध केंद्रीय मानवाधिकाऱ्यांसमोर तक्रार केली जाणार असल्याचे सांगितले. तर, विवाहानंतर सात वर्षाच्या आत नादियाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्याबद्दल न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणे बंधनकारक आहे. त्यामुळे तिची पुन्हा गोव्यात शवचिकित्सा करण्याची मागणी महिला संघटनांनी केल्यानंतर उत्तर गोवा न्यादंडाधिकाऱ्यांनी तिचा दुसऱ्यांचा शवचिकित्सा करण्याचा आदेश दिला. या संपूर्ण घटनेचा ग्रीन गोवा फाउंडेशन या बिनसरकारी संस्थेने निषेध केला आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी राज्य सरकार हे कटकारस्थान रचत असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष रायसन आल्मेदा यांनी केला आहे.
या बाबतीत उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याकडे चौकशी केली असता मृत महिलेच्या विवाहाला सात वर्षे पूर्ण न झाल्याच्या कारणावरून चौकशी करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण पोलिसांकडून आपणाकडे आलेले असून शवचिकित्सेचा अहवाल आल्यानंतर आपण दोन दिवसांत या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी सुरू करू, असे त्यांनी सांगितले. लोटली येथील नादियाचा विवाह फातोर्डा येथील व्हिंसेंट बार्रेटो या तरुणाशी कायदेशीर नोंदणी पद्धतीने २००४ साली झाला होता व २००७ साली चर्चमध्ये नोंदणी झाली. परंतु एका वर्षाच्या आत उभयतांमध्ये वाद निर्माण झाला व २००८ पासून ती वेगळी राहू लागली. घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात चालू आहे.
सबेरा संस्थेच्या तारा केरकर यांनी दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याशी पुन्हा शवचिकित्सा करण्याची मागणी केली होती. सायंकाळी ४.३० वाजता दुसऱ्यांदा शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
"बायलांचो एकवट' या महिला संघटनेच्या आवडा विएगश व सबेराच्या तारा केरकर या दोघांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून तिला रॅटोल घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या राजकारणी मित्राची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
काल संध्याकाळी दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्याची मागणी केली होती. त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ती फेटाळली लावील होती. त्यानंतर रात्री उशिरा, तिच्या विवाहाला सात वर्षे पूर्ण न झाल्याने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची गरज आहे, अशी मागणी करताच उपजिल्हाधिकारी आग्नेल यांनी दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्याचा आदेश दिला होता. आज सकाळी अंत्यसंस्कारासाठी शव नेण्याची तयारी करीत असतानाच सदर आदेश मृत महिलेच्या नातेवाइकांकडे पोहोचून पोलिसांनी त्या शवचिकित्सा करण्यास मृतदेहाचा ताबा घेतला. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस संरक्षणात तो मृतदेह बांबोळीहून मडगाव येथील हॉस्पिसीयो इस्पितळात आणण्यात आला. काही जणांनी बांबोळी येथेच शवचिकित्सा करण्याची मागणी केली होती. परंतु दंडाधिकाऱ्यांनी हे प्रकरण दक्षिण गोव्यातील असल्याने चार डॉक्टरांच्या पथकाला दक्षिणेतच शवचिकित्सा करण्याचा आदेश दिला. आज दुपारी ३.३० वा. मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळातील डॉ. अविनाश पुजारी, डॉ. सीयानो फर्नांडिस (रोग निदान तज्ज्ञ), डॉ. मिनाक्षी पाणंदीकर (स्त्री रोग तज्ज्ञ) व डॉ. सवितलाझा (वैद्यकीय अधिकारी) या चार डॉक्टरांच्या पथकाने शवचिकित्सा केली. उशिरापर्यंत सदर शवचिकित्सा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळाला नव्हता.
दुसऱ्यांदा शवचिकित्सा केल्याबद्दल लोटलीच्या बिगरसरकारी संस्थेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुटुंबीयांना या मृत्यूबद्दल कोणत्याच प्रकारचा संशय नसूनही दुसऱ्यांदा शवचिकित्सेची मागणी करण्याचा अधिकार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
ग्रीन गोवा फाउंडेशनने तोरादो कुटुंबीयांवर फार मोठे संकट आलेले असताना तसेच चेन्नई येथील इस्पितळाच्या डॉक्टरांनी शवचिकित्सा केलेली असताना दुसऱ्यांदा शवचिकित्सा करायला लावल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. गेले दोन आठवडे ती मरणाशी झुंज देत होती अशा काळातही पोलिसांनी तिची जबानी घेतलेली आहे. पोलिस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्याला त्यात गुंतवून गोवा सरकारच्या मंत्रिमंडळातून पदच्युत करण्याचे कारस्थान करीत आहेत, असे ग्रीन गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष रायसन आल्मेदा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आज लोटली चर्चमध्ये मृत महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी चाललेली असताना अचानक येऊन पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी नेल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांच्या या वागणुकीमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
लोटली येथील बिगर सरकारी संस्थेच्या श्रीमती मिरांडा यांनीही दुसऱ्यांदा शवचिकित्सा करायला लावल्याबद्दल आक्षेप घेतला. घरच्या माणसांनी त्याबद्दल कोणताही संशय व्यक्त केला नसताना परक्यांच्या मागणी वरून शवचिकित्सा करण्याचा आदेश देणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे, असे त्या म्हणाल्या. लोटली येथे आज सर्वत्र दुःखाची सावली पसरलेली दिसली. ज्या महिला संघटनांनी शवचिकित्सा करण्याची मागणी केली त्यांनी सदर महिला मुंबई व चेन्नई येथे उपचारासाठी दाखल असताना तेथे जाऊन तिची विचारपूस केली होती काय, असा सवाल विचारून, एका निष्पाप मृतदेहाशी खेळण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
----------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांची टोलवाटोलवी
नादिया दोरादो मृत्यू प्रकरणी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले असता पत्रकारांवरच उलटवार करून त्यांनी सर्वांनाच पेचात टाकले. याप्रकरणी सातत्याने एका मंत्र्यांचे नाव घेतले जात आहे, यावर आपली प्रतिक्रिया काय, असा साधा सवाल त्यांना विचारताच "तुम्हाला खबर आहे तर मग मला काय विचारता' असा प्रतिसवाल करून त्यांनी हा मुद्दाच फिरवला. या प्रकरणी आपल्याकडे एका महिला संघटनेचे निवेदन फॅक्सव्दारे पोहचल्याची माहिती त्यांनी दिली. हे निवेदन पाहिले नसल्याने त्यावर वक्तव्य करणे त्यांनी टाळले.या प्रकरणाची चौकशी पोलिस करीत आहेत. पोलिस चौकशीत हस्तक्षेप करण्याची आपल्याला सवय नाही. यावेळी आपण वक्तव्य केल्यास त्याचा विपरीत परिणाम चौकशीवर होण्याची शक्यता असल्याचे निमित्त पुढे करून त्यांनी याविषयावर टोलवाटोलवीच करणे पसंत केले.

No comments: