Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 March, 2010

वास्कोत गोळी झाडून कामगाराला लुबाडले

वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): काम आटोपून पायवाटेने घरी परतत असलेल्या करियप्पा मदार (वय २८, रा. चिखली) याच्यावर अज्ञाताने गोळीबार करून त्याच्याकडील दोन हजार पन्नास रुपयांची रक्कम लंपास करण्याची घटना काल (२२ रोजी) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. चिखली येथील एका प्रसिद्ध खासगी इस्पितळाजवळच ही घटना घडली. गोळी लागून गंभीर जखमी झालेला करियप्पा घटनास्थळीच विव्हळत पडून होता, सुमारे ३ तासांनंतर त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या वास्को शहरात गोळी झाडण्यासारखा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
चिखली येथील आईस फॅक्टरीसमोर राहणारा करियप्पा सदर प्रसिद्ध इस्पितळाच्या मागच्या बाजूस असलेल्या रस्त्यावर पोचला असता त्याच्या मागावर असलेल्या अज्ञाताने त्याच्यावर गोळी झाडली. करियप्पा रस्त्यावर कोसळल्यावर त्याच्या खिशातले पाकीट काढून तेथून पलायन केले. सदर रस्ता वर्दळीचा नसल्याने करियप्पा सुमारे तीन तास घटनास्थळीच पडून होता.
साडेसात ते आठच्या दरम्यान घरी परतणारा करियप्पा दहा वाजेपर्यंत घरी आला नसल्याने त्याच्या नातेवाइकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. साडे दहाच्या सुमारास त्यांना तो जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात लोळत असल्याचे आढळून आले. यानंतर त्याच्या नातेवाइकांनी त्याला प्रथम घरी नेऊन नंतर सदर पोलिसांना माहिती दिली. करियप्पा यास मध्यरात्री १२.३० च्या सुमारास गोमेकॉत दाखल करण्यात आले. वास्को पोलिसांच्या माहितीनुसार करियप्पा याच्या पाठीत गोळी लागल्याने दोन बोटे जाणार येवढा छेद निर्माण झाला असून देशी पिस्तुलाचा (कट्टा)वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सदर भागात लोकांची फारशी वर्दळ नसली तरी येथे अनेक मोठमोठे बंगले असून या ठिकाणी श्रीमंतांचे वास्तव्य आहे. तसेच करियप्पा हा कामगार असून गोळी झाडण्यामागे केवळ चोरीचा उद्देश होता का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, आज सकाळी करियप्पावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ब्राझ मिनेझिस यांनी दिली. करियप्पा विवाहित असून त्याचा एक नातेवाईक मंजुनाथ याने पोलिस स्थानकावर सदर घटनेबाबत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून भा.दं.सं. ३९४ तसेच शस्त्रास्त्र कायदा ३ रे/वि २५ (१बी) (ए) व २७ खाली गुन्हा नोंद केला आहे. वास्को पोलिस निरीक्षक ब्राझ मिनेझिस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.

No comments: