Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 March, 2010

...तर कदंबच्या गाड्या जप्त करू

कर्जफेडीसंदर्भात सहकारी बॅंकेचा इशारा
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राज्य सरकारने कदंब महामंडळासाठी गोवा राज्य सहकारी बॅंकेकडून घेतलेल्या ३० कोटी रुपयांची परतफेड अद्याप केलेली नाही. गरज पडल्यास आम्ही कदंब बसेस जप्त करू, असा इशारा आज बॅंकेचे अध्यक्ष रामचंद्र मुळे यांनी दिला.
गोवा राज्य सहकारी बॅंकेत सरकारी खाते सुरू केले जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. गाड्या खरेदी करण्यासाठी सरकारने सुमारे ३० कोटी रुपये घेतले होते, त्यातील सुमारे १० कोटी रुपये वसूल करण्यात आले होते. त्यावेळी सुमारे २७ कोटी रुपये बाकी राहिले होते. परंतु, कर्ज घेण्यासाठी करण्यात आलेल्या कराराचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आलेले नसल्याने ती रक्कम आता पुन्हा ३७ कोटी रुपये एवढी झाल्याची माहिती श्री. मुळे यांनी दिली. सदर बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेली असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास केंद्राकडे तक्रार केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेला कदंब महामंडळ जबाबदार नसून राज्य सरकारचा दोष असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा राज्य सहकारी बॅंकेने स्थापन केलेल्या स्वयंसेवी गटांची समिती जाहीर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी राज्यस्तरीय समिती तसेच उत्तर आणि दक्षिण गोव्याची महिला समिती जाहीर करण्यात आली. राज्यस्तरीय आणि उत्तर गोवा जिल्हा समितीच्या अध्यक्षस्थानी अपर्णादेवी राणे यांची निवड झाली तर, दक्षिण जिल्हा समितीवर छाया पै खोत यांची निवड झाली असल्याचे त्यांनी जाहीर केले.
सुमारे २ हजार स्वयंसेवी गट असून याद्वारे उत्तम कार्य सुरू आहे. २५ लाखांपर्यंत कर्ज या गटाद्वारे दिले जात आहे. २५ हजार रुपयांसाठी ४ टक्के व्याजदर तर, २५ ते ३५ हजारासाठी ५ टक्के, ३५ ते ५० हजार रुपयांसाठी ९.५ टक्के व्याज दर आकारले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुरुषांपेक्षा महिला गटाकडून देण्यात येणाऱ्या कर्जाची वसुली योग्य प्रकारे आणि ठरलेल्या वेळी होत असल्याचाही अनुभव असल्याचे श्री. मुळे यांनी यावेळी सांगितले.

No comments: