Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 March, 2010

सरकारच्या भोंगळ कारभारावर आमदारांची चौफेर टीका

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राज्य सरकारचा प्रशासनावरील ताबा पूर्णपणे सुटला आहे. सरकारातील मंत्र्यांचे आपापसातील मतभेद राज्याच्या विकासाला अडथळा निर्माण करणारे ठरले आहेत. सरकारातील मंत्री एकमेकांशी भांडत असतानाच ही संधी साधून सरकारी अधिकारीही निर्ढावलेले आहेत व त्यामुळे राज्याचा विकास खुंटला आहे, अशी चौफेर टीका आज विधानसभेत विरोधी भाजप आमदारांसह सत्ताधारी आमदारांनीही केली.
राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावाला विरोधी भाजपतर्फे एकूण ५३ दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. प्रत्येक खात्यागणीक राज्यपालांनी आपल्या भाषणात केलेल्या उल्लेखाला आक्षेप घेत तेथील गैरकारभारावर भाजपने बोट ठेवून या दुरुस्ती सूचना मांडल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मांद्र्याचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी चर्चेला सुरुवात केली. या सरकारच्या काळात बेकायदा खाण उद्योग फोफावला. आत्तापर्यंत सत्तरी, सांगे, केपे, काणकोण, डिचोली आदींपर्यंत मर्यादित राहिलेल्या खाण उद्योगाची वक्रदृष्टी आता पेडणे तालुक्यावरही पडली आहे. खाण खात्याकडे सादर झालेल्या अर्जांत पेडण्यातील तुये, पार्से, हरमल, मांद्रे, धारगळ, वारखंड आदी गावांचा समावेश आहे. खाणींमुळे होणाऱ्या वाताहतीचा अनुभव पाहता शेवटच्या श्वासापर्यंत पेडण्यात खाणींना शिरकाव करू देणार नाही, असे पार्सेकर म्हणाले. सायबरएज योजना, संगणक शिक्षकांना सेवेत नियमित करणे, शिक्षण संस्थांना पायाभूत सुविधांसाठी आर्थिक साह्यता आदी योजना रखडत असल्याचेही यावेळी श्री. पार्सेकर म्हणाले.
पूरग्रस्त काणकोणवासीयांच्या पुनर्वसनाबाबत सरकार अजिबात गंभीर नाही, अशी टीका आमदार रमेश तवडकर यांनी केली. प्रत्यक्षात येथील लोकांचे नुकसान व मिळालेली भरपाई यात अजिबात साम्य नाही. शेतीची प्रचंड हानी झाली असतानाही सुमारे दीड हजार अर्ज सरकारकडे अजूनही पडून आहेत. लोकांना घरे बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले पण त्या कामालाही चालना मिळालेली नाही, असेही ते म्हणाले. आमदार दयानंद मांद्रेकर यांनी एक तास पिण्याचे पाणी देण्याचीही या सरकारची कुवत नसल्याचा गंभीर आरोप केला.
सत्ताधारी पक्षातर्फे हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनीही अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात सरकारचा पंचनामा केला. उत्तर व दक्षिण गोवा अशी विभागणी विकासकामांच्या संदर्भात या सरकारने केली आहे काय, असा सवाल उपस्थित करून प्रत्येक मंत्री आपला मतदारसंघ ही आपली वैयक्तिक मक्तेदारी असल्यागत वागत असल्याची जोरदार टीका त्यांनी केली.

No comments: