Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 March, 2010

सावधान! पेडणे तालुक्यावरही खाण व्यावसायिकांची वक्रदृष्टी

एकाच कंपनीकडून ४११ हेक्टर जमिनीसाठी नऊ अर्ज दाखल

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- आजपर्यंत खाण व्यवसायाच्या अभद्र सावटापासून दूर राहिलेल्या पेडणे तालुक्यावरही आता खाण व्यावसायिकांची वक्रदृष्टी वळली असून त्यामुळे पेडणे तालुक्यावरही अवकळा ओढवण्याची भिती निर्माण झाली आहे. मयेचे आमदार अनंत शेट यांनी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नावर उत्तर देताना खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली. पेडणे तालुक्यात खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण नऊ अर्ज सादर झाले आहेत व हे नऊही अर्ज "मेसर्स आशापुरा माईनकॅम लिमिटेड' या एकाच कंपनीचे असून त्याद्वारे ४११ हेक्टर जमिनीची मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडील खाण खात्याने दिलेल्या लेखी उत्तरानुसार गेल्या २००७ - ०८ व २००८ - ९ या दोन वर्षांत विविध ठिकाणी नवीन खाणी सुरू करण्यासाठी खाण खात्याकडे सुमारे ७० अर्ज दाखल झाले आहेत. या ७० अर्जांपैकी सर्वांत जास्त अर्ज हे केवळ "मेसर्स आशापुरा माईनकॅम लिमिटेड' या एकाच कंपनीकडून दाखल झाले आहेत. या अर्जांचे वैशिष्ट हे की आत्तापर्यंत खाण व्यवसायापासून दूर राहिलेल्या पेडणे तालुक्यातच नऊ ठिकाणी खाण सुरू करण्यासाठी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात वारखंड, तुये, पार्से, मांद्रे, हरमल, धारगळ आदी गावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त केपे तालुक्यातील बाळ्ळी, नाकेरी, किटल, मोरपिर्ल, फातर्फे, केडे, तिळय, भेंडोरे, खोर्डे आदीं गावांचाही समावेश आहे.
काणकोण तालुक्यात गावडोंगरी, आगोंद, लोलये, खोला, सासष्टी तालुक्यात वेळ्ळी, कुंकळ्ळी, आंबेली, सांगे तालुक्यात काले, साकोर्डे, कोष्टी, डिचोली तालुक्यात बोर्डे, कुडचिरे, सत्तरी तालुक्यात मेळावली, कामरकोंड आदी गावांचा समावेश आहे.
मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पेडणे तालुक्यात खाणींना परवानगी दिल्यास अजिबात स्वस्थ बसणार नाही असा इशाराच दिला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत खाणींना विरोध करू, असेही त्यांनी सरकारला बजावले आहे. कोरगाव - भाईड येथे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या जागेत तळे खोदण्याच्या निमित्ताने खनिज उत्खनन सुरू आहे, असा संशय पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी व्यक्त केला असता तिथे काम बंद असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री कामत यांनी दिला.

No comments: