Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 March, 2010

आरोग्यमंत्र्यांच्या वाढदिनी अश्रूंची भेट

उपोषणकर्त्या मलेरिया सर्वेक्षकांकडे सरकारचे अजूनही दुर्लक्ष
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गेल्या पाच दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी पणजीत आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया सर्वेक्षक कामगारांची बाजू ऐकून घेण्याचे दूरच राहिले, उलट आपल्या स्थितीची जाणीव सरकारला करून देण्यासाठी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कण न घेता केवळ पाणी पिऊन असलेल्या या कामगारांनी डोळ्यात प्राण आणून ""आम्हाला आमचे काम द्या'' अशी घोषणा देत मोर्चा काढला, पण पन्नास मीटरवरच त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी घोषणा देत असताना अनेक कामगार चक्कर येऊन खाली कोसळले. येत्या शुक्रवार पर्यंत आम्हाला न्याय न मिळाल्यास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या दोनापावला येथील बंगल्यासमोर बसून उपोषण करण्याचा इशारा या कामगारांचे नेतृत्व करणारे प्रेमदास गावकर यांनी दिला.
आपल्या मतदारसंघातील लोकांना भरती करून घेण्यासाठी आम्हाला या मंत्र्याने नोकरीवरून कमी करून रस्त्यावर टाकले, असा आरोप त्यांनी केला. आम्हालाही मुलेबाळे आहेत. गेली १४ वर्षे आम्ही मलेरिया सर्वेक्षक म्हणून नोकरी केली आहे. अशा पद्धतीने एकाएकी बेरोजगार केल्याने आमच्यावर उपासमारीचा प्रसंग आला आहे, असे श्री. गावकर यांनी डोळ्यात आलेले अश्रू रोखत सांगितले. उपोषणाला बसून प्राणत्याग करणे हा एकमेव पर्याय आमच्या समोर राहिला आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कशा पद्धतीने विश्वासघात केला याची जंत्रीच पत्रकारांपुढे ठेवली.
हॉटेल "सिदाद द गोवा'चा काही भाग मोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले तेव्हा मुख्यमंत्री कामत यांनी १४० वर्षे मागे जाऊन कायद्यात बदल केला आणि ते बांधकाम वाचवले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, आपण हे हॉटेल वाचवण्यासाठी केलेले नसून त्यातील कामगारांना बेरोजगार होण्यापासून वाचवण्याच्या हेतूने केले आहे. आता आम्हीही आता बेरोजगार झालेले आहोत. आमची दया तुम्हाला का येत नाही, असा भावविवश प्रश्न त्यांनी केला.
पाच दिवसांपासून कोणत्याच मंत्र्याने किंवा आमदारांनी या कामगारांची दखल घेतलेली नाही. मलेरिया कामगार संघटनेचे अध्यक्ष गावकर यांना चक्कर आल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यात आला होता. तेथे असलेल्या लोकांच्या प्रयत्नाने प्रेमदास शुद्धीवर आल्यावरही शेवटपर्यंत रुग्णवाहिका पोचली नाही. हा दूरध्वनी पणजी पोलिस उपविभागीय उपअधीक्षक देऊ बाणावलीकर तसेच पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी केला होता. प्रेमदास यांच्यासह तुळशीदास हडकोणकर, राकेश नार्वेकर, गणपत गोलतकर, सविता नार्वेकर, मालिनी नाईक व सुषमा फडते आदी उपोषणकर्ते कामगार चक्कर येऊन खाली कोसळले.
सुमारे ७२ कामगारांवर ही बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आजच्या मोर्चाचे नेतृत्व ऍड. सुभाष सावंत व सुदेश कळंगुटकर यांनी केले.
-----------------------------------------------------------------------
हा मोर्चा सुरू असताना एका ४५ वर्षीय कामगाराला रडू कोसळले. भावनाविवश होऊन घोषणा देणारा हा पिडीत कामगार अक्षरशः रडत होता. आम्हाला रस्त्यावर टाकणारे आरोग्यमंत्री आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. हे आमचे आणि आमच्या मुलांचे अश्रू त्यांना वाढदिवसाची भेट आहे, असे तो म्हणाला.

No comments: