Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 23 March, 2010

तरुणांनी राजकीय बजबजपुरी रोखावी: शशिकला काकोडकर

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): 'आमचे गोंय आमचे गोंय' म्हणून वेगळे राज्य आम्ही पदरात पाडून घेतले. परंतु, आज या गोव्याचे काय झाले ते आम्ही पाहत आहोत. गोव्यात सध्या जे काय चालले आहे ते बरोबर नाही. सध्या जी राजकीय बजबजपुरी माजली आहे ती तरुणांनी थांबवली पाहिजे. त्यासाठी तरुणांनी राजकारणात येण्याची गरज असल्याचे मत गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी व्यक्त केले. कला अकादमीच्या कृष्ण कक्षात ""मनुष्य आणि पुस्तक'' या विषयावर शशिकलाताईंच्या खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांना ताईंनी दिलखुलास उत्तरे दिली.
महिलांनी आरक्षण मिळवून नव्हे तर स्वतःच्या कर्माने पुढे आले पाहिजे, तेव्हा कोणताच पुरुष तिला रोखू शकणार नाही, असे वैयक्तिक मत नोंदवून सध्या जी राखीवता दिली जात आहे त्यातही महिलांचा गैरवापर केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या गोव्यात ग्रामसभेवर निवडून येणाऱ्या महिलांना पुढे करून त्यांचे पुरुष मागच्या दारातून पैसे कमवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोणताच पक्ष तरुणांसाठी राजकीय कार्यशाळेचे आयोजन करीत नाही, याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.
साहित्य व संगीताची अत्यंत आवड असल्याचे स्पष्ट करताना त्या विषयांची अनेक पुस्तके माझ्या वाचनालयात आहेत, असे ताईंनी सांगितले. अजुनीही मला संगीत शिकण्याची फार इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या. "नाट्यगीत आणि भावगीतांपेक्षा शास्त्रीय संगीताची जास्त आवड आहे. या आवडीमुळे घरातील वाचनालय संगीत तसेच विविध प्रकारच्या साहित्याने भरलेले आहे. तुम्हाला कधी हवी असल्यास तुम्ही येऊन ती पुस्तके वाचू शकतात', असेही ताईंनी सांगून टाकले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोकणी भाषा मला आवडते पण वाचायला अडखळते. सर्वांना सर्व भाषा यायला पाहिजेत. अनेक भाषांत उत्तम अशी साहित्यनिर्मिती झाली आहे. मात्र "रोमी आणि देवनागरी'वरून सुरू असलेला वाद खटकतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भाऊंच्या आठवणींना उजाळा देताना ताईंनी सांगितले की, भाऊ नास्तिक असतानाही आजारपणात त्यांनी माझ्याकडून ज्ञानेश्र्वरी वाचून घेतली होती. मलेरियाचा तापा आला म्हणून ते काहीकाळ झोपूनच होते. त्यावेळी त्यांनी पहिल्या दिवशी "कर्मयोग' हा ज्ञानेश्र्वरीतला भाग वाचून घेतला. दुसऱ्या दिवशी भक्तियोग आणि तिसऱ्या दिवशी ज्ञानयोग वाचून घेतल्याची ताईंनी सांगितले.

No comments: