Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 March, 2010

मद्यघोटाळ्याचा पैसा दहशतवादासाठी

विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचा पुनरुच्चार
पुराव्यांदाखल उदाहरणांपुढे सरकार "गप्प'
वार्षिक ५०-६० कोटींची महसूलगळती
पंजाब, राजस्थानमध्ये घोटाळ्याचे जाळे

पणजी, दि. २५ (विशेष प्रतिनिधी): अबकारी खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे गोव्यात अबकारी महसुलाला जबरदस्त गळती लागली असून, वार्षिक सुमारे ५०-६० कोटी रुपयांचा अबकारी कर बुडविला जात आहे. गोव्यात बनावट अबकारी परवान्याद्वारे अस्तित्वात नसलेल्या किंवा बंद पडलेल्या दारू कारखान्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा मद्य घोटाळा करण्यात येत आहे. यातून निर्माण होणारा बेहिशेबी पैसा पंजाब आणि पूर्वोत्तर राज्यांतील अतिरेकी कारवायांसाठी पुरविला जात असल्याचा संशयवजा आरोप आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केला.
गोव्यात विविध प्रकारे होणारा अबकारी घोटाळा ही अत्यंत गांभीर्याने पाहण्यासारखी बाब असून यात अनेक अबकारी कर्मचारी, अधिकारी व इतर महनीय व्यक्ती सामील असण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआय किंवा निदान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपविण्याची जोरदार मागणी आज श्री. पर्रीकर यांनी केली.
या गैरव्यवहाराचे गोव्यातील धागेदोरे शोधण्यासाठी सभागृह समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली. राज्य महसुलाची प्राप्ती व गळती यावर गाढा अभ्यास असलेल्या श्री. पर्रीकर यांनी सभागृहापुढे अल्कोहोलचा काळाबाजार, बनावट परवाने व गेटपास यांचे काही उदाहरणे वाचून दाखविली. श्री. पर्रीकर म्हणाले की, या घोटाळ्याबाबत मी माहिती हक्क कायद्याच्या अधिकाराने गेल्या दोन वर्षांत सुमारे दोन ट्रक भरतील एवढी कागदपत्रे जमा केलेली आहेत. गोवा, पंजाब व राजस्थान या क्षेत्रात या मद्य घोटाळ्याचे जाळे पसरले आहे. गोव्यातील अबकारी खात्याचे अनेक कर्मचारी व अधिकारी वर्ग या गैरव्यवहारात खोलवर रुतले आहेत. त्यांना बाजूला काढल्याशिवाय धागेदोरे सापडणे मुश्कील आहे, असेही ते म्हणाले.
अबकारी खात्यातील विविधांगी घोटाळ्यांचे एक उदाहरण सादर करताना श्री. पर्रीकर यांनी सांगितले की, ऍक्वा इंडस्ट्रीज कुंकळ्ळीच्या नावाने लाखो रुपयांचे परवाने (परमिट) जारी करण्यात आली आहेत, पण महत्त्वाचे म्हणजे हा कारखाना कुंकळ्ळी येथे मुळीच नाही तर ऍक्वा इंडस्ट्री हा कारखाना काणकोणात आहे, तेव्हा अबकारी खात्याने तो कुंकळ्ळी येथे असल्याचे दाखवून परवाने का दिले? असाही सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, यावर कहर म्हणजे याविषयी पडताळा करण्यासाठी ग्वाल्हेर येथून आलेल्या अबकारी आयुक्तांच्या फॅक्सला गोव्यातील अबकारी खात्यातील नवनाथ नाईक यांनी सही करून उत्तरही पाठविले आहे. ही सही नवनाथ नाईक यांचीच आहे किंवा ती बनावट आहे, तसेच ऍक्वा इंडस्ट्रीजच्या नावे हे परवाने अन्य कोणीतरी जारी केले नाही ना, हे पडताळणे अत्यंत गरजेचे आहे, असे श्री. पर्रीकर म्हणाले.
आणखी एक उदाहरण देत त्यांनी सांगितले की, आशा इंडो लिमिटेड या झुवारीनगर वास्को येथील कंपनीच्या नावाने १,०४,००० लीटर अल्कोहोलची निर्यात दाखविली गेली आहे. पण प्रत्यक्षात या कारखान्यामध्ये गेल्या ५ वर्षांत उत्पादनच झालेले नाही. हा काय घोटाळा आहे? असा प्रश्न करत त्यांनी सरकारला कोंडीत पकडले.
श्री. पर्रीकर यांनी केलेल्या अनेक प्रश्नांच्या भडिमारामुळे सभागृहात एकदम शांतता पसरली. श्री. पर्रीकर यांनी सादर केलेले सबळ पुरावे व सखोल माहितीपुढे सरकारपक्षाला निरुत्तर व्हावे लागले. सरकार कोणतीच पावले उचलत नसल्यास आपल्यालाच पोलिस तक्रार करावी लागेल, तसेच यासंबंधी पंतप्रधानांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. "वित्त सचिवांकडून योग्य ती विचारपूस चालू आहे', असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वेळ निभावून नेली.

No comments: