Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 14 December, 2008

"आत्मभान लाभलेली स्त्रीच साकारायची आहे"

अभिनेत्री मृणाल देव - कुलकर्णी यांचे मनोगत
सचिन वेटे
पणजी,दि. १३ - नशिबाला दोष देत केवळ रडत राहणाऱ्या व्यक्तिरेखा साकारायला आपल्याला कधीच आवडत नाहीत, असे स्पष्ट मत अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांनी प्रकट केले. आत्मभान लाभलेली स्त्रीच आपल्याला साकारायची आहे व आपल्या भूमिकांतून समर्थ अशी स्त्रीच प्रेक्षकांपुढे आणावयाचा आपला नेहमी प्रयत्न असतो, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
सौंदर्य, प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा मनोज्ञ असा त्रिवेणी संगम म्हणजे अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी."स्वामी' या ऐतिहासिक टीव्ही मालिकेतील "रमाबाई'या पहिल्याच भूमिकेतून प्रकाशझोतात आलेल्या व त्यानंतर कधीच मागे वळून न पाहणाऱ्या मृणाल कुलकर्णी आज मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात भरभरून बोलल्या. या मेळाव्यानिमित्त त्यांची खास प्रकट मुलाखत ज्योती कुंकळ्ळीकर व मयुरेश वाटवे यांनी घेतली.
"माहेरची साडी' या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका केवळ अशा नकारात्मक व्यक्तिरेखेमुळे आपण नाकारली. काही गोष्टी या कुंडलीतच लिहिलेल्या असतात."स्वामी' मालिकेतील रमाबाई ही आपल्या कुंडलीतच लिहिली होती व अगदी अनपेक्षितपणे ही भूमिका आपल्याला मिळाली. शुटींगचे काही दिवस विलक्षण तणावाचे गेले; पण पहिला भाग पाहिल्यावर कॅमेरा या माध्यमाची ताकद आपल्याला समजली.आज आपण जे काही आहोत त्याचे बरेचसे श्रेय "स्वामी' या टीव्ही मालिकेला जाते, असे त्या म्हणाल्या.
एखाद्या कलाकाराला प्रत्यक्ष नावाने न ओळखता व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखले जाते,तेव्हा कसे काय वाटते असा प्रश्न केला असता त्या म्हणाल्या की रसिकांनी आपल्या अभिनयाला ती दिलेली दाद असते व त्यामुळे आनंदच होतो. आपण साकारत असलेली भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहचली याचा तो एकार्थाने पुरावाच म्हणावा, असे त्या म्हणाल्या. "स्वामी'मालिकेतील रमाबाईची भूमिका केल्यानंतर तशाच प्रकारच्या भूमिका कराव्या लागतील,अशी भिती वाटली का,यावर त्या लगेच "नाही' म्हणून उत्तरल्या. तुमच्याकडे अभिनयक्षमता व भूमिकेनुसार स्वतःच्या दिसण्यातला वेगळेपणा साकारता येत असेल तर तुम्ही कुठलीही भूमिका करू शकता,असे त्या म्हणाल्या. आपण द्रौपदी सारख्या पौराणिक,रमा-जीजाबाई सारख्या ऐतिहासिक,अवंतिकासारख्या प्रचलित व सोनपरीसारख्या "फॅन्टसी'अंगाने जाणाऱ्या भूमिका यशस्वीपणे करू शकल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती सोनिया गांधी यांची व्यक्तिरेखा साकारायला आवडेल का,या प्रेक्षकांमधून आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्स्फूर्तपणे "नक्कीच'अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एखादी स्त्री सर्वस्वी अनोळखी वातावरणात स्वतःला कशी मुरवून घेऊ शकते आणि परिस्थितीने दिलेल्या आव्हानांचा मुकाबला कशी समर्थपणे पेलू शकते याचे उदाहरण म्हणजे सोनिया गांधी असे त्या म्हणाल्या. एक राजकारणी म्हणून नव्हे तर स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून सोनियांची व्यक्तिरेखा साकारायला आवडेल,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आपण समाजात राहत असल्याने समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य ठरते व त्यामुळे समाजसेवा ही करावीच असे त्या म्हणाल्या. आजच्या स्त्रीला जर सक्षम व्हायचे असेल तर त्यांनी आपल्या घरातील पुरुषांना आधी घडवलं पाहिजे,असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आजच्या स्त्रीने आपल्या रोजच्या व्यापातून निदान एक तास जरी स्वतःला दिला तरी स्त्री खूप मोठा पल्ला गाठू शकते,असेही त्या म्हणाल्या. "करिअर'आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांची सांगड योग्यरितीने घालता आली पाहिजे.आपण कुटुंबाला किती वेळ देतो यापेक्षा तो कसा देतो याला महत्त्व असल्याचेही त्या म्हणाल्या. गोमंतकातही आता चांगली चित्रपट निर्मिती होत असल्याचे समाधान तिने व्यक्त केले. एखादी चांगली व्यक्तिरेखा गोमंतकीय निर्मात्यांनी आणली तर गोमंतकीय चित्रपटातून भूमिका करायला नक्कीच आवडेल,असेही मृणाल यांनी माधवी देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी मृणाल यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाला भारावून माधवी देसाई यांनी पुढील गोमंतकीय चित्रपटातील नायिका मृणाल कुलकर्णी अशी घोषणा केली व हा बहारदार कार्यक्रम कधी संपला हे कोणाला कळलेच नाही.

No comments: