Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 17 December, 2008

पेडणे किनारी भागात रेव्ह पार्ट्या, ध्वनी प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


किनारी भागात आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांचे संग्रहित छायाचित्र.(छाया: निवृत्ती शिरोडकर)

मोरजी, दि. १८ (वार्ताहर): पेडणे तालुक्यातील हरमल, आश्वे - मांद्रे व मोरजी या किनारी भागात बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवसांत रेव्ह पार्ट्यांचे छुप्या मार्गाने आयोजन केले जात आहे. कर्णकर्कश संगीत लावून या पार्ट्यांचे आयोजन होत असताना पोलिस तसेच पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या भागातील शॅक्स, रेस्टॉरंट व्यावसायिकांनी पेडणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संगीत वाजण्याचे परवाने घेतले आहेत. याद्वारे विदेशी पर्यटकांचे वाढदिवस तसेच इतर समारंभांचे निमित्त करून किनारी भागात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यामुळे स्थानिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. पार्टी आयोजकाकडे तक्रारदाराचे नाव उघड होण्याच्या भीतीने स्थानिक पोलिसांकडे तक्रार करणे टाळत आहेत.
किनारी भागातील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ध्वनी प्रदूषण देखरेख समिती निवडण्यात आली आहे. पेडणे तालुक्यासाठी निवृत्ती शिरोडकर व ऍड. प्रसाद शहापूरकर या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुक्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्यरत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याच प्रकारच्या ध्वनी प्रक्षेपणास कायद्याने बंदी असली तरी किनारी भागात याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. संगीत वाजण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत मर्यादा असून परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मर्यादेचे पालन होते की नाही याची पडताळणी करण्यासाठी कोणतीच कृती होत नाही. विदेशी नागरिकाचे वैयक्तिक समारंभ हे पार्ट्यांचे कारण कसे होऊ शकते, असा सवाल उपस्थित होत आहे. परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी येथून होत आहे. तसेच परवाना देताना भेदाभेद होत असल्याचा आरोप एका शॅक व्यावसायिकाने केला आहे. ध्वनी प्रक्षेपण करण्यासाठी तीन वेळा अर्ज करूनही अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचे या व्यावसायिकाचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी ध्वनी प्रदूषणाच्या चार तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. परंतु,यंदा कायद्याचे उल्लंघन होत असूनही एकही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. हरमल, मोरजी, आश्वे - मांद्रे येथे सर्रासपणे सुरू असलेल्या पार्ट्यांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.
गृह मंत्रालयाने या प्रकाराची त्वरित दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी येथून होत आहे.

No comments: