Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 14 December, 2008

भारत - पाक यांच्यात "युद्ध नको' करार व्हावा

नवाज शरीफ यांचा प्रस्ताव
इस्लामाबाद, दि. १३ - भारत व पाकिस्तान यांच्यात "युद्ध नको' करार व्हावा असा प्रस्ताव पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सुचवला आहे. पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या साह्याने वा अण्वस्त्रांच्या साह्याने आम्ही प्रथम हल्ला करणार नाही असा करार या दोन्ही राष्ट्रांनी करावा. दोन्ही देशांच्या दृष्टीनेही असे करणे उत्तम राहील, असे शरीफ म्हणाले.
एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुंबई अतिरेकी हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला अतिरेकी अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक आहे, यासंदर्भात वृत्तपत्रांत आलेल्या वृत्ताच्या अनुषंगाने शरीफ आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.
कसाब संदर्भातील वृत्त जर खरे असेल तर पाकिस्तानने याची गंभीरपणे नोंद घेणे आवश्यक आहे. केवळ दखलच घेऊ नये तर याबाबत गंभीरपणे कारवाईसुध्दा केली जावी, असे शरीफ म्हणाले. दरम्यान, जमात-उद्-दावा या संघटनेच्या व तिच्या नेत्याविरुध्द पाकिस्तान सरकारने जी कारवाई प्रारंभ केली आहे त्यावर पाकिस्तानी प्रसिध्दी माध्यमांनी सर्वसाधारणपणे समाधान व्यक्त केले आहेे. तर काहींनी सरकारने आणखी काही पावले उचलणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले आहे.
पाकची मानसिकताच
संशयास्पद : मुखर्जी
दिल्ली, दि. १३ ः पाकिस्तान त्यांच्या भूमीवर दहशतवादी शिबिरे चालविणाऱ्या संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करेलच याची भारताला खात्री नसून आजवरचा अनुभव बघता भारताला पाकच्या मानसिकतेवर संशय असल्याचे रोखठोक प्रतिपादन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी केले आहे.
यापूर्वीही पाकच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी उपयोग करणाऱ्या घटकांविरुद्ध अगदीच नगण्य कारवाई करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात हा देश तरबेज असून देखावा करण्यातही पटाईत आहे. त्यामुळेच या देशाने लष्करविरुद्ध चालविलेल्या कारवाईत खरेच दम आहे की नाही याबद्दल आपण साशंक असल्याचे मुखर्जी म्हणाले.
मुंबई हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांविरुद्ध पाकने पुरावे मागितल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, भारत पुरावे देण्यास तयार आहे. परंतु सध्याच असे करता येणार नाही कारण चौकशी सुरू आहे.
जे पुरावे आमच्याकडे आहेत ते सर्वच आम्ही पाकिस्तानपुढे ठेवू. सध्या पुराव्यांबाबत चौकशी सुरू आहे. तत्काळ ते पाकिस्तानच्या हाती सोपविणे घाईचे ठरेल असे सांगून शेजारी देशात सध्या सुरू असलेल्या अभियानाबद्दल त्यांनी सीएनएन-आयबीएन वाहिनीवरील "डेव्हिल्स ऍडव्होकेट' कार्यक्रमात बोलण्याचे टाळले.
१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरही पाकने दाखवण्यासाठी अशीच कारवाई केली होती. आतंकवादी संघटनांच्या काही प्रमुखांना अटक करण्यात आली. कालांतराने वातावरण शांत झाल्यानंतर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी मात्र पाकिस्तान खरेच गांभीर्याने दहशतवादी संघटनांविरुद्ध पाश आवळतो की नाही तेच सध्या आपण लक्षपूर्वक बघत आहोत असे मुखर्जी म्हणाले.
दहशतवादाचे केंद्र पाकिस्तानात असून आंतरराष्ट्रीय समुदायाला कठोर व परिणामकारक उपायांसह याचा सामना करण्यासाठी तयार राहावे लागेल असे आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी केले होते. याकडे लक्ष वेधले असता प्रणव मुखर्जी यांनी सांगितले की, पाकिस्तान वारंवार त्यांच्या सीमेपलीकडील घटकांचा भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात असल्याची ओरड करीत असतो. परंतु, खरे तर हे घटक त्यांच्याच सीमेच्या आत राहून आतंकवादाचे सूत्रसंचालन करीत असतात. म्हणूनच मी वारंवार पाकिस्तानी घटकांचे नाव घेत असतो. हे एक असे विशेषण आहे ज्याचे मी नेहमीच सावधपणे उच्चारण केले आहे असे स्पष्ट करून, भारतीय गुप्तचर संस्था यासंदर्भात अंतिम निष्कर्ष देण्यापूर्वी मी देखील सविस्तर बोलू इच्छित नाही असे ते म्हणाले.
पाकने जमात-उद-दावाविरुद्ध मोहीम उघडल्यानंतर मुखर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे. जमात ही लष्करची प्रमुख संघटना असून या दहशतवादी संघटनेवर नुकतीच युनोने बंदी घातली आहे.
भारतात गुन्हा केल्यानंतर जे पाकच्या आश्रयाला गेले आहेत असे आणि पाकचे नागरिक असून जे भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त आहेत अशा दोन प्रकारच्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी असलेले एक विरोधपत्र भारताने पाकिस्तानला पाठविले असून उत्तरात पाक एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ भारतात पाठविण्याची योजना आखत असल्याची माहिती मुखर्जी यांनी दिली.
दाऊद इब्राहिमसारख्या काही गुन्हेगारांनी भारतात गुन्हा केल्यानंतर पळून पाकमध्ये आश्रय घेतला. अशा समाजकंटकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करता यावी म्हणून त्यांना पाकने भारताला सोपवावे अशी आम्ही मागणी केली. परंतु पाकने सरळ नकार दिला आहे. मसूद अझहरसारख्यांना भारताला सोपविण्यात पाकला कोणती अडचण आहे तेच आपल्याला कळत नाही. त्याला भारतात अटक झाली होती. परंतु कंधारमध्ये भारतीय विमानाच्या अपहरणकर्त्यांनी त्याची मागणी केल्यानंतर प्रवाशांच्या बदल्यात त्याला सोडण्यात आले होते. तो सध्या पाकमध्ये असून तेथील टीव्ही वाहिन्यांवरही सतत दिसत असतो. त्याला भारताकडे सोपविण्याची पाकची इच्छा नसेल तर मग त्याला नजरकैदेत ठेवण्याचा अर्थच काय तेही आपल्याला कळत नसल्याचे संरक्षण मंत्र्यांनी मत व्यक्त केले.
मुंबई हल्ल्यांचा एकमेव जीवित आरोपी अजमल कसाबसोबत पाकने वाणिज्य दूतावास स्तरावर संपर्क साधण्याची इच्छा व्यक्त केली होती काय, असे विचारले असता पाकने अधिकृतपणे अशी विनंती केली असल्याची माहिती आपल्याला नसल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.
भारत देशाच्या अखंडतेसाठी सर्व उपाय करण्यास तत्पर आहे. परंतु युद्ध कोणत्याही समस्येवरील तोडगा असूच शकत नाही असेही त्यांनी सांगितले. यावर भारत आणखी किती वेळ वाट बघणार असे विचारले असता पाकिस्तान किती लवकर उत्तर देतो किंवा उत्तर देतही नाही यावर सर्वकाही अवलंबून असल्याचे मुखर्जी म्हणाले.

No comments: