Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 July, 2008

बॉंबस्फोटांनी अहमदाबादही हादरले
२६ ठार, शंभरहून अधिक जखमी, सायकलींत लपवली स्फोटके

अहमदाबाद, दि. २६ - बंगलोरमध्ये काल शुक्रवारी झालेल्या बॉंबस्फोटांची मालिका ताजी असतानाच आज (शनिवारी) गुजरातच्या या राजधानीला सायकलमध्ये लपवण्यात आलेल्या अशाच साखळी बॉंबस्फोटांच्या मालिकेने हादरवले. त्यात किमान २६ जणांचा बळी गेला असून सुमारे शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. एकूण १७ ठिकाणी स्फोट झाले. त्यातील काही स्फोटके बसमध्ये लपवण्यात आली होती, अशी माहिती अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी. के. परमार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
सायकलींवर लावलेल्या टिफिनमध्ये ही स्फोटके लपवण्यात आली होती. मणिनगर, इसमापूर, हटकेश्वर, बापूनगर, गोविंदवाडी, ठक्करनगर, जयादर चौक, सारंगनगर, साखेज, सारंगपूर ब्रिज, नरोल सर्कल, ओढाव, सारसपूर, चकला परिसर, राजेंद्र पार्क, कोयला मंदिर, सत्तार बाप्पा नगर, जोहापुरा आदी ठिकाणी हे स्फोट झाले. या परिसरात आणखीही जिवंत बॉंब असण्याची शक्यता असून ते शोधण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संध्याकाळी ६.४५ वाजता पहिला स्फोट झाला व त्यानंतर लागोपाठ हा सारा परिसर स्फोटांच्या मालिकेने हादरला. मणिनगर हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच मतदारसंघ आहे. जखमींना तातडीने विविध रुग्णांलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन इस्पितळांच्या बाहेरही हे स्फोट घडवले गेले. स्फोट होताच मोबाईलचे नेटवर्क जॅम झाले. त्यामुळे लोकांना परस्परांशी संपर्क साधणे कठीण बनले होते. बंगलोरमध्ये स्फोट झाले तेव्हा असाच प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गुजरातमधील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ही माहिती गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. या स्फोटांच्या संदर्भात पोलिसांनी एका सायबर कॅफेच्या मालकाला व त्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी सांगितले की, हे स्फोट होण्यापूर्वी गुप्तचर विभागाला "इंडियन मुजाहिद्दीन'कडून "शक्य असेल तर आम्हाला रोखून दाखवा' अशा स्वरूपाचा मेल मिळाला होता. गेल्या वर्षी लखनौ (उत्तर प्रदेशची राजधानी) येथे घडवून आणलेल्या बॉंबस्फोटांसारखाच हा प्रकार असल्याचे सांगण्यात आले.
रक्ताचे सडे व आक्रोश
अहमदाबादेत दहा किलोमीटरच्या परिसरात एकापाठोपाठ एक असे स्फोट झाल्यानंतरचे दृश्य करुण दिसत होते. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. जखमी झालेले लोक विव्हळत होते. तसेच मृतांचे अवयव ठिकठिकाणी विखुरले होते. मृत व जखमी झालेल्या व्यक्तींचे नातेवाइक आक्रोश करत होते.
स्फोटांचा तीव्र निषेध
राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "पोटा' कायदा रद्द करणे हा चुकीचा निर्णय होता, अशी प्रतिक्रिया अडवाणी यांनी व्यक्त केली.
नुकसान भरपाईची घोषणा
या बॉंबस्फोटांत मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर जखमींच्या नातेवाइकांना पन्नास हजार रुपये भरपाई दिली जाईल, अशी घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी विविध इस्पितळांत जाऊन जखमी लोकांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला.
गृह मंत्रालयाची आज बैठक
या स्फोटांनंतर दक्षिण भारतातील अनेक महत्त्वाच्या मंदिरांभोवती सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच गुजरातमध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कमांडोज दाखल झाले आहेत. लागोपाठ घडलेल्या या स्फोटांमुळे नवी दिल्लीत उद्या रविवारी गृह मंत्रालयाची खास बैठक सकाळी अकरा वाजता बोलावण्यात आली आहे.

No comments: