Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 27 July, 2008

आक्रमक शिरदोनवासीयांची सरपंच व सचिवाला धक्काबुक्की

ग्रामसभेचा आठ तासांचा विक्रम
पणजी, दि.27 (प्रतिनिधी) - शिरदोन पंचायत क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या मेगा प्रकल्पाबाबत ग्रामपंचायतीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ आज येथील ग्रामस्थांनी सरपंच व पंचायत सचिवांना चांगलाच इंगा दाखवला. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा तीन वेळा तहकूब करण्यात आली. ही सभा झालीच पाहिजे असा हेका धरून पोलिस बंदोबस्त व तिसवाडी तालुका मामलेदारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत ग्रामसभा चालू ठेवण्याचा विक्रम शिरदोनवासीयांनी आज केला, परंतु आजच्या ग्रामसभेच्या कामकाजाचा एकही विषय चर्चेला न येता गेल्या ग्रामसभेच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यातच ही सभा आटोपती घेण्याची वेळ पंचायत मंडळावर आली.
राज्यात सर्वांत प्रथम मेगा प्रकल्पांविरोधात आवाज काढणाऱ्या शिरदोनवासीयांनी आज खऱ्या अर्थाने लोकजागृती व लोकशक्तीचे दर्शन घडवले. शिरदोन पंचायत क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून दोन मेगा प्रकल्पांचे काम सुरू आहे. हे प्रकल्प "सीआरझेड'कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करून त्याची कोणतीही माहिती देण्यास पंचायत तयार नसल्याने ग्रामस्थांनी याविरोधात दंड थोपटले आहे. आज जेव्हा सकाळी 10.30 वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीस पंचायत सचिव रेन्सी जुलियो डायस यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचायला सुरुवात केली. ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतलेले निर्णय व प्रत्यक्षात सचिवांनी वाचलेले इतिवृत्त यात मोठ्या प्रमाणात तफावत जाणवल्याने वादाला सुरुवात झाली. सचिवांनी आपल्या मर्जीप्रमाणे ठराव लिहिल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी सरपंच सुषमा काणकोणकर यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामसभेत सुमारे तीनशे ते साडेतीनशे लोकांना सामोरे जाण्याचे धारिष्ट्य नसलेल्या सरपंचांना बोलण्याचे व लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याचे धाडस नसल्याने त्यांची पाचावर धारण बसली व एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना सचिवांकडून उत्तरे देण्याचे प्रयत्न सुरू झाले असता या गोंधळाचे पर्यवसान ढकलाढकलीत झाले व त्यात सचिवांना काही प्रमाणात मारहाणही झाल्याची माहिती मिळाली आहे. पंचायत सचिवांना जमिनीवर पाडण्यात आल्याची माहिती येथील काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिली. यावेळी सरपंच काणकोणकर यांनी ग्रामसभा तहकूब केली असता ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला व गोंधळा अधिक वाढला. यावेळी पणजी पोलिस स्थानकातून पोलिसांची तुकडी तिथे तैनात करावी लागली. तिसवाडीचे गट विकास अधिकारी , पोलिस उपअधीक्षक बाणावलीकर व आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेष कर्पे यांनी ग्रामस्थांची समजूत काढून अखेर पुन्हा एकदा ग्रामसभेला सुरुवात केली. ग्रामसभेला पुन्हा एकदा सचिवांनी ठरावात केलेल्या फेरफारीचा विषय चर्चेला आला. यावेळी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे आपण ठराव लिहिल्याचे सचिवांनी उत्तर दिले व त्याचवेळी सरपंचांनी या विधानाला आक्षेप घेतल्याने पुन्हा एकदा सचिव ग्रामस्थांच्या टीकेचे लक्ष्य बनले. दोन्ही मेगा प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या परवान्याबाबत निर्णय घेण्याबाबतचा खुलासा लोकांनी सरपंचाकडे मागितला असता ती काहीही बोलण्यास तयार नसल्याने तिने पुन्हा एकदा ग्रामसभा तहकूब करण्यात आली. यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभा अशी तहकूब करता येत नसल्याचे समजवल्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. सरपंचांना जबाब देता येत नसेल तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अशी मागणी काही लोकांनी केली. प्रत्येक वेळी सचिवांकडून आपली चूक झाल्याचे सांगितले जात असल्याने त्याला आक्षेप घेत या चुकीबाबत काय कारवाई करणार अशी विचारणा केली असता तरीही सरपंच काहीही बोलत नसल्याने ग्रामस्थ अधिकच बेजार झाले. यावेळी सचिवांकडून पुन्हा चूक झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन सरपंचांना द्यावे लागले.
गेल्या ग्रामसभेचे संपूर्ण इतिवृत्त बदलावे लागण्याची पाळी सचिवांवर आली. दरम्यान, सत्ताधारी गटातील तीन व विरोधी गटातील तीन पंच सदस्य हजर होते परंतु सरपंच या नात्याने व ग्रामसभेचे अध्यक्ष या नात्याने सरपंचांनीच उत्तरे देण्याची गरज असल्याचा हेका ग्रामस्थांनी लावल्याने महिला सरपंचांची मात्र चांगलीच गोची झाली. दरम्यान, या ठिकाणी मेगा प्रकल्पांचे काम करणाऱ्या विकासकांना ग्रामसभेत बोलावून या प्रकल्पाची माहिती ग्रामस्थांना देण्याची मागणी करण्यात आली होती त्याबाबतही पंचायत काहीही करीत नाही. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू असून पंचायतीला त्याबाबत काहीच माहीत नसणे हे दुर्दैव असून अशावेळी आता ग्रामस्थांनाच कडक भूमिका घेणे भाग पडल्याची माहिती उपस्थित काही ग्रामस्थांनी दिली. आमदार,खासदार किंवा मंत्री लोकांची दिशाभूल करतात हे मान्य परंतु गावाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधीच जर अशा पद्धतीने वागू लागले तर मात्र लोकांना त्याविरोधात बंड पुकारणे गरजेचे असून जनतेचा धाक निर्माण झाल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही,असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

No comments: