Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 2 August, 2008

खनिज वाहतूक व्यवसाय संकटात मांडवी व जुवारी पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): राज्याला भरपूर महसूल प्राप्त करून देणारा बार्जव्दारे खनिज वाहतुकीचा व्यवसाय मांडवी व जुवारी अशा दोन्ही महत्त्वाच्या पुलांच्या सुरक्षेवरून संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. बंदर कप्तान खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात सध्या याच विषयावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
बांधकाम खात्याने अलीकडेच कप्तान खात्याला पाठवलेल्या एका पत्रात १० हजार टनाच्या बार्जेसवर मांडवी व जुवारीखालून जाण्यास बंदी घालण्याची शिफारस केली आहे व अनेक बार्जमालक प्रशिक्षित मास्तर ठेवत नसल्यानेच पुलांना धोका उद्भवल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याप्रकरणी खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी पुलाच्या खांबाला बार्जकडून दिलेल्या धडकांमुळे या पुलाच्या सुरक्षेवरून बांधकाम खात्यातील अधिकाऱ्याची झोप उडाली आहे. यापुढे पुलाखालून जाणाऱ्या बार्जेसच्या वाहतुकीवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याने त्यासंबंधी बंदर कप्तान खात्याला कडक पत्र पाठवण्यात आले आहे. १ हजार टनाच्या बार्जेसचा धक्का पुलाच्या खांबाला बसल्यास पुलाची सुरक्षाच धोक्यात येऊ शकते. यासाठी या बार्जेसना अन्य मार्ग शोधून देण्याचा सल्ला खात्याने दिला आहे. बार्जमालकांकडून अप्रशिक्षित कामगारांची भरती केली जाते व त्यामुळेच बार्ज चालवणारे मास्तर बेजबाबदारपणे पुलाखालून बार्जेस नेत असल्यानेच हे अपघात घडत असल्याचेही बंदर कप्तानांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे.
२००७ साली "सी हॉर्स'नामक बार्जेसचा धक्का बसल्याने नव्या मांडवी पुलाच्या खांब क्रमांक १३ ला सुमारे ६.५ मीटरचा तडा गेल्याचे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने ("एनआयओ') केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. मांडवी पुलाखालून सुमारे तीनशे बार्जेस प्रवास करतात असे सांगून पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखणे गरजेचे बनल्याची माहिती बांधकाम खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दरम्यान,बंदर कप्तान अधिकाऱ्यांनी या बार्जेसवर अचानक भेट देऊन तपासणी करण्याची गरज असल्याचेही खात्याने म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंदर कप्तानाकडे २६५ बार्जेसची नोंदणी आहे व केवळ ११५ प्रशिक्षित मास्तर असल्याचेही खात्यामार्फत उघड झाले आहे.
याप्रकरणी बंदर उपकप्तान जे. ब्रागांझा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी या मुद्यांचे खंडन न करता खात्यावर काही निर्बंध असल्याची माहिती दिली. याप्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य करून बार्जेसची तपासणी करण्यासाठी खात्याला वेगळ्या बोटींची आवश्यकता आहे तसेच राज्याच्या संपूर्ण समुद्रीपट्ट्यावर नजर ठेवण्याइतकी यंत्रणा खात्याकडे नसल्याचे मान्य केले. कर्मचारी व इतर आवश्यक यंत्रणांचा अभाव यामुळे काही गोष्टी खात्याच्या आटोक्यात नसल्याचेही ते म्हणाले.
यापुढे अशा तपासण्या करण्याची तयारी दर्शवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बार्जेस ताब्यात घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जुवारी व मांडवी नदीवरील कोकण रेल्वे पुलाच्या खांबाना ज्याप्रमाणे संरक्षक कुंपण तयार केले आहे त्याच पद्धतीचे लोखंडी कुंपण मांडवी व जुवारी पुलांना असायला हवे होते, त्यामुळे निदान धोक्याचे प्रमाण तरी कमी झाले असते असेही ब्रागांझा म्हणाले. हे सुरक्षा कुंपण आता बांधणे कठीण असून ते सुरुवातीलाच शक्य होते. स्टीलचे कुंपण घालायचे झाल्यास ते खर्चिक काम होणार असल्याचे बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले.

No comments: