Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 March, 2011

भ्रष्टाचारी कॉंग्रेसला गाडून टाकू!

गोव्याच्या मुक्तीसाठी एकत्र येण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे आवाहन
भाजपच्या ‘कलंकित सरकार’ पुस्तिकेचे प्रकाशन

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): गोव्यात सर्व क्षेत्रांत माफियांचाच सुळसुळाट झाला असून या माफियांपासून गोव्याला मुक्त करण्यासाठी भाजप सर्व गोवेकरांना बरोबर घेऊन रण माजवणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे लोकसभा उपनेते तथा गोव्याचे राष्ट्रीय निवडणूक प्रभारी गोपीनाथ मुंडे यांनी केले. गोव्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची नितांत गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भ्रष्टाचारी कॉंग्रेस आघाडी सरकारला गाडून टाकण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट कृत्यांचा पर्दाफाश करणार्‍या ‘कलंकित सरकार’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज गोमंतक मराठा समाज सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आले. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच पक्षाचे आमदार तथा प्रदेश भाजप पदाधिकारी हजर होते. या मेळाव्याला संबोधताना खासदार मुंडे यांनी केंद्र सरकारच्या भ्रष्ट कारभारावर चौफेर हल्लाबोल केला.
गोव्यातील विविध घोटाळ्यांवरून केंद्र सरकारला धारेवर का धरत नाही, असा सवाल काही पत्रकार करतात; पण मुळात कॉंग्रेसचे केंद्र सरकारच महाकाय अशा भ्रष्टाचारांत आकंठ बुडालेले असताना त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवता येईल काय, असा प्रतिप्रश्‍न श्री. मुंडे यांनी उपस्थित केला. राज्यात ड्रग्ज माफियांबरोबरच बेकायदा खाण, वन, सुरक्षा आदी क्षेत्रांतही माफियांचा उच्छाद सुरू आहे. ‘तुम्ही खा, मीही खातो’ अशा पद्धतीचे तंत्रच इथे कॉंग्रेसने अवलंबिले आहे. ‘सत्तेव्दारे संपत्ती व संपत्तीतून पुन्हा सत्ता’ ही कॉंग्रेसची नीती आहे. महात्मा गांधींच्या कॉंग्रेसमधील नैतिकता सोनिया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये नाही. ए. राजाचा १ लाख ८६ हजार कोटींच्या घोटाळा ‘कॅग’ कडून उघडकीस आणला गेला, भाजपने विरोध केला असतानाही केंद्रीय दक्षता आयुक्तपदी पंतप्रधानांनी भ्रष्ट अशा व्यक्तीचीच निवड केली, ही नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. पंतप्रधानांवर ओढवलेली देशाच्या इतिहासातील ही पहिलीच नामुष्कीजनक घटना ठरली आहे. ‘क्लीन पीएम’ अशी ख्याती असलेल्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून मान्यता मिळवलेल्या या घोटाळ्यांचा त्यांना कोणताच थांगपत्ता लागत नाही याचा अर्थ काय, असा परखड सवाल यावेळी खासदार मुंडे यांनी उपस्थित केला. विदेशी बँकांत असलेला काळा पैसा आणण्यासाठी ज्या अर्थी कॉंग्रेस काहीच प्रयत्न करीत नाही, त्याअर्थी हा पैसा कॉंग्रेस नेत्यांचाच असावा, या शक्यतेला बळकटी मळते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यास हा सारा पैसा स्वदेशात आणू, असे आश्‍वासनही यावेळी त्यांनी दिले.
केंद्रात भ्रष्टाचार प्रकरणांवरून एकामागोमाग एक मंत्र्यांची गच्छंती होते आहे; गोव्यातील भ्रष्ट नेत्यांनाही घरी पाठवण्यासाठी गोमंतकीयांना तीव्र लढा उभारावा लागेल. गोव्याचे राष्ट्रीय निवडणूक प्रभारी या नात्याने संपूर्ण राज्याचा दौरा करून गोव्यातील दशमुखी भ्रष्टाचारी रावणाला गाडून टाकण्याचे आवाहन आपण गोमंतकीयांना करणार आहोत, असे जाहीर करतानाच या परिवर्तनाची सुरुवात पणजी महापालिका निवडणुकीपासूनच होऊ द्यात, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
बाबूश यांनी पणजीतून निवडणूक लढवावीच ः पर्रीकर
ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते पणजीतून निवडणूक लढवत असतील तर या भ्रष्ट जरासंधाचा वध करण्याची पुण्याई पणजीवासीयांना लाभणार आहे, असा जबर ठोसा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी यावेळी बोलताना लगावला. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बाबूश यांच्याकडे शिक्षण खात्याची सूत्रे बहाल करणे यावरूनच सरकारचे नेमके तंत्र जनतेसमोर उभे राहते. महापालिकेसाठी लोकांना टीव्ही वाटले जातात, पण याच टीव्हीवर कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे पाहण्याची संधी लोकांना प्राप्त होत आहे. पणजीतील लोकांनी महापालिका निवडणुकीसाठी भ्रष्टाचाराचा अंत करण्याच्या निर्धारानेच बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले. पैसा कमावण्याची संधी शिक्षण खात्यात मिळत नाही आणि त्यामुळे पणजी महापालिकेच्या निमित्ताने पुन्हा लूट करण्याचाच हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक हे ड्रग्ज प्रकरणांत सहभागी असल्याचा आरोप होतो; पण हाच रॉय बेकायदा खाण व्यवसायातही सामील आहे, असा आरोपही पर्रीकर यांनी केला. खोटारडेपणा व भानगडी यांचा सुंदर मिलाफ रवी नाईक यांच्यात दिसतो. उच्च न्यायालयाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावलेले व आयकर खात्याने छापा टाकलेले विश्‍वजित राणे तरीही फारच गुर्मीने वागत आहेत. म्हापसा जिल्हा इस्पितळ सुरू झाले नाही, पण भरती मात्र झाली. म्हापशात एका रुग्णवाहिकेमागे १८ चालकांची नेमणूक झाली आहे. आयकर छापा पडल्यानंतर वारंवार विश्‍वजित बंगळूरला का धावतात, हे त्यांनी जनतेला सांगावे. आता यापुढे जनतेलाच या भ्रष्ट नेत्यांकडे सत्ता द्यावी की नाही यावर अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे, असे पर्रीकर म्हणाले.
पुस्तिका नव्हे ग्रंथच हवा : प्रा. पार्सेकर
राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी छोटीशी पुस्तिका पुरणार नाही तर त्यावर एक भला मोठा ग्रंथच काढावा लागेल, असा टोला प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हाणला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपला पक्ष, कार्यकर्ते, जुने मित्र तथा इतर अनेक गोष्टी बदलल्या; पण गेली अकरा वर्षे त्यांनी खाण खाते मात्र अजिबात बदललेले नाही. शिक्षण कमी असले म्हणून चर्चिल आलेमाव ‘पर्सेंटेज’ च्या बाबतीत मात्र फारच हुशार आहेत. आरोग्य खात्याचे ‘पीपीपी’करण हे दलाली मिळवण्यासाठीच सुरू आहे, असा आरोप प्रा. पार्सेकर यांनी केला. भाजप कार्यकर्त्यांनी ‘कलंकित सरकार’ची लफडी घरोघरी पोचवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अल्पसंख्याकांना केवळ मतांसाठी कुरवाळले : फ्रान्सिस डिसोझा
निधर्मीवादाचे ढोल बडवून कॉंग्रेसने आत्तापर्यंत अल्पसंख्याकांचा केवळ मतांसाठी वापर केला, असा ठपका भाजप विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांनी ठेवला. सुमारे ३५ टक्के अल्पसंख्याक असलेल्या राज्यात केवळ ९ टक्के रोजगार या घटकाला मिळतो, यावरून कॉंग्रेसच्या निधर्मीवादाचा बुरखा टराटर फाटला आहे, असे ते म्हणाले. मुस्लिमांची कब्रस्तानाची मागणी अजूनही पूर्ण होत नाही याचा अर्थ काय, असा सवाल करून भ्रष्टाचार विरोधातील सुरू झालेल्या लढ्याला पणजी महापालिका निवडणुकीतूनच सुरुवात व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्यथा कॉंग्रेसने देशच विकला असता : श्रीपाद नाईक
देशात न्यायव्यवस्था नसती तर एव्हाना कॉंग्रेसने हा देशही विकून टाकला असता, असा सडेतोड आरोप खासदार श्रीपाद नाईक यांनी केला. देशात व राज्यातील परिस्थितीवरून भीषण चिंता करण्यासारखीच परिस्थिती बनली आहे. समस्त गोमंतकीयांना आता एक मिशन म्हणूनच ही भ्रष्ट राजवट उलथून लावावी लागेल, असेही ते म्हणाले.
चर्चिलकडून सरकारी तिजोरीची लूट : दामोदर नाईक
सा. बां. खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी विकासकामांच्या नावे ‘पर्सेंटेज’च्या माध्यमाने सरकारी तिजोरीची लूट चालवली आहे, असा घणाघाती आरोप आमदार दामोदर नाईक यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री व खात्याचे अभियंते त्यांच्यासमोर लाचार बनले आहेत. पाण्याच्या टाक्यांचा घोटाळा काढला म्हणून भाजपवर गरीब विरोधी असल्याचा आरोप करणार्‍या कॉंग्रेसला सरकारी तिजोरी म्हणजे आपल्या बापाची मिरासदारी वाटते काय, असा खडा सवालही त्यांनी केला. एखादी योजना राबवायचीच असेल तर त्यासाठी कायदेशीर मान्यता घ्या. आपल्या मर्जीनुसार सामान्य जनतेचा पैसा वापरण्याचा सरकारला कोणताच अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
महिलांनो सावध राहा : कुंदा चोडणकर
भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांतून महिला स्वयंसाहाय्य गटांना पैसा पुरवणार्‍या सत्ताधारी नेत्यांपासून सावध राहा, असे आवाहन भाजप महिला मोर्चा अध्यक्ष कुंदा चोडणकर यांनी केले. कॉंग्रेसकडून महिलांना लाचार बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप महिलांनी कॉंग्रेसच्या या कटाला बळी पडण्यापासून महिलांना रोखावे, असेही त्या म्हणाल्या. सणासुदीला घरोघरी ‘पार्सल’ पाठवण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे व त्याला कठोरपणे धुडकावून लावण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केले.

No comments: