Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 2 January, 2011

भ्रष्ट कॉंग्रेस नेत्यांना घरी पाठवणारच: मिकी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)ः‘आपणावर विनाकारण नादिया तोरादोच्या मृत्यूचे बालंट घालून व इतरही खोटे आरोप करून मुळापासूनच उखडण्याचे षड्यंत्र राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी रचले.‘मनी लॉडरिंग’च्या आरोपाखाली आपली सगळी बँक खाती गोठवून आपल्याला लक्ष्य बनवण्याचेही प्रयत्न झाले. एवढे करूनही मिकी पाशेको अजूनही ताठ मानेने उभा आहे, या भीतीपोटीच कॉंग्रेस पक्षातील तथाकथित मंडळींच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे’.
‘प्रुडंट मिडीया’ या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत मिकी पाशेको यांनी कॉंग्रेस नेत्यांचा पोलखोल करून त्यांना चांगलेच फैलावर घेतले. आपणावरील आरोप अजूनही सिद्ध व्हायचे आहेत, पण यापूर्वी अनेक प्रकरणांत तुरुंगाची हवा खाऊन आलेले नेते आपल्यावर गुन्हेगारीचा आरोप करून आपली बदनामी करीत सुटले आहेत, त्यांना गोमंतकीय जनता चांगलीच ओळखून आहे, असा शेराही त्यांनी मारला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी आपली मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे व त्याचा निकाल तेच लावतील,असा विश्‍वासही मिकी यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस नेत्यांकडून वारंवार ‘एकला चलो रे’ चा नारा देऊन राष्ट्रवादीची अवहेलना करण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे व त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने चाळीसही मतदारसंघात उमेदवार उतरवण्याची भाषा केली तर त्यात गैर काय,असा सवालही मिकी यांनी यावेळी केला. चाळीस मतदारसंघांपैकी किती मतदारसंघांत विजय मिळवणार,असा सवाल केला असता किमान दहा जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस सहजपणे जिंकू शकेल, असा दावा करून उर्वरित तीस मतदारसंघांत कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना पाणी पाजू, अशी पुष्टी मिकी यांनी जोडली.गोव्यात राष्ट्रवादीचा प्रसार करण्यासाठी आपले नेतृत्व श्रेष्ठींनी मान्य केले आहे व आपल्याला श्रेष्ठींचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. पुढील विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय जनतेला एक स्वच्छ, लोकाभिमुख व जनतेचे हित पाहणारे सरकार देण्याचा संकल्पच आपण सोडला आहे. पुढील विधानसभा निवडणूक ही आपल्यासाठी युद्धासमान असेल व या युद्धात स्वरक्षणापेक्षा विजयी होण्यासाठीच आपण उतरणार असल्याचे ते म्हणाले. आपले वैयक्तिक मत नुवे मतदारसंघात आहे व त्यामुळे आपण नुवे मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही मिकी यांनी या मुलाखतीत केली. नुवे मतदारसंघाकडे कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा पुनर्उच्चारही त्यांनी केला. नुवे मतदारसंघ हा सध्या कॉंग्रेसकडे आहे हे जरी खरे असले तरी ज्याअर्थी कॉंग्रेस नेत्यांना स्वबळावर निवडणूक लढवण्याची खुमखुमी आली आहे, त्याअर्थी पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना आघाडीत रस नाही, हेच स्पष्ट होते व त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आपली सारी ताकद पणाला लावण्याचे ठरवले आहे,असेही ते म्हणाले.
जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांचे मंत्रिपद का काढून घेतले जात आहे, असा सवाल केला असता हा आपल्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय आहे व त्याबाबत आपले श्रेष्ठीच भाष्य करतील,असे ते म्हणाले. हा निर्णय श्रेष्ठींनी कोणत्या आधारावर घेतला याचा जाब त्यांना श्रेष्ठीच देतील,असेही ते म्हणाले.पुढील पाच वर्षांत गोव्याचे राजकारण कसे असेल याचे स्पष्ट चित्र आपल्या नजरेसमोर आहे व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण सर्व काही पणाला लावू, असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला. सासष्टी तालुका म्हणजे आपली मिरासदारी आहे,अशा जोशात वावरणार्‍या नेत्यांची येत्या विधानसभा निवडणुकीत कशी हवा निघेल हे पाहत रहा,अशी पुष्टी त्यांनी जोडली.
---------------------------------------------------------------------------
हा तर मोठा विनोदच!
वारंवार कॉंग्रेसच्या पोटात सुरा खुपसून आपला वैयक्तिक स्वार्थ साधलेले चर्चिल आलेमाव कॉंग्रेसच्या धोरणांचा उदोउदो करतात हाच मुळी मोठा विनोद आहे, असा टोला मिकी पाशेको यांनी हाणला.

No comments: