Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 January, 2011

मंदिर महासंघाचे उद्या उद्घाटन

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): गोव्यात गेल्या काही वर्षात अनेक चोर्‍या व देवांच्या मूर्ती भंजनाचे प्रकार घडलेत. मात्र सरकार सदर प्रकारावर नियंत्रण आणू शकलेले नाही. त्यामुळे आता भाविकांनाच एकत्र येऊन आपल्या धार्मिक स्थळावरील होणारे आघात रोखण्याची गरज आहे. सरकारने याप्रकरणी आपले ठोस धोरण जाहीर करावे, अशी जोरदार मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी आज येथे केली.
येथील मनोशांती हॉटेलच्या सभागृहातील पत्रपरिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत पंडित (म्हापसा), उपाध्यक्ष राजकुमार देसाई (पर्वरी), समन्वयक जयेश थळी (बार्देश), शिवप्रसाद जोशी ( पेडणे), महाबळेश्वर चिबडे (डिचोली) व अर्जुन नाईक (मडगाव) हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, मंदिरावरील व धार्मिक स्थळावर होणारे आघात रोखून सर्वांना एकत्र आणून देवस्थानांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंदिर महासंघाची गरज असून महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महासंघ स्थापण्यात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळाकडे विद्यमान सरकार दुर्लक्ष करत आहे.
कायद्याची तथा पोलिसांची भीती चोरांना नसल्यानेच हे सर्व प्रकार घडत असून यावर सरकारने गंभीरपणे विचार करावा, असे सरकारला श्री शिंदे यांनी आवाहन केले.
सर्व मंदिरात समन्वय निर्माण व्हावा, भाविकांना योग्य सुविधा मिळून मंदिरातून समाजहितकारी कार्ये घडावीत यासाठी महासंघ स्थापन करण्यात येत असून जास्तीत जास्त मंदिर समिती सदस्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जयेश थळी यांनी केले. महासंघाचे अध्यक्ष भाई पंडित यांनी भाविकांना धार्मिक सुरक्षा व मंदिर सुरक्षा यासाठी सर्व हिंदू बांधवांनी या महासंघात सहभागी व्हावे असे आवाहन केले. उपाध्यक्ष राजकुमार देसाई यांनी मंदिरे धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक केंद्रे बनावीत यासाठी महासंघ प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
-----------------------------------------------------
महासंघाचे उद्घाटन पर्वरीत
येत्या ८ तारखेला पर्वरी येथील संत गाडगे महाराज सभागृहात संध्याकाळी ४.०० वाजता ‘गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’चे उद्घाटन होणार आहे. दि. ९ रोजी विश्‍व हिंदू परिषदेची जाहीर सभा असल्याने हा कार्यक्रम दि. ८ रोजी ठेवण्यात आल्याचे श्री. थळी यांनी स्पष्ट केले.

No comments: