Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 4 January, 2011

अंतिम वैद्यकीय परीक्षेचे पेपर फुटल्याने खळबळ

- मागचे पेपरही रद्द
-चौकशी समिती नियुक्त

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाची प्रश्‍न पत्रिका फुटल्याची माहिती उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. आज सकाळी काही पत्रकारांनी फुटलेल्या प्रश्‍न पत्रिकेच्या प्रती घेऊन महाविद्यालय गाठल्याने महाविद्यालयाच्या डीननी सुरू असलेली परीक्षा तडकाफडकी रद्द केली. तसेच, याची कल्पना गोवा विद्यापीठाला देण्यात आली. गोवा विद्यापीठाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. तर डॉ. केतन गोवेकर, काशिनाथ शेट्ये आणि ऍड. अतीश मांद्रेकर यांनी आगशी पोलिस स्थानकावर पेपरफुटीची सखोल चौकशी करण्याची मागणी करून तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठाने स्थापन केलेली चौकशी समिती प्राथमिक अहवाल येत्या ४८ तासांत सादर करणार आहे.
विद्यापीठ समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत ‘जनरल मेडिसीन १ आणि २’ हे पेपर पुढे ढकलण्यात आले आहत, त्याचप्रमाणे १ जानेवारी रोजी लिहिलेला पेपर १ रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती डीन डॉ. जिंदाल यांनी दिली. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने झालेलीही परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
‘पेपर फुटणे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जातो. चौकशी समिती आपला प्राथमिक अहवाल येत्या ४८ तासांत सादर करणार आहे. मात्र पुढील सखोल चौकशी सुरू राहणार आहे’, असे गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिलीप देवबागकर यांनी सांगितले.
पेपर फुटल्याचे लक्षात येताच परीक्षा रद्द करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाचे पेपर कालच रात्री काही पत्रकारांच्या हाती लागले होते. त्यांनी आज सकाळी या पेपरसह गोवा वैद्यकीय महाविद्यालय गाठले. विद्यार्थ्यांचा जो पेपर सुरू होता त्या पेपरची हस्तलिखित प्रत डीनना दाखवण्यात आली. तोवर मुलांची परीक्षा सुरू झाली होती. मुलांच्या हातात पडलेली प्रश्‍नपत्रिका आणि पत्रकारांनी दाखवलेली प्रत यातील २० पैकी १६ प्रश्‍न जशास तसे होते. हे पाहून धक्का बसलेल्या डीननी याची माहिती त्वरित गोवा विद्यापीठाला दिली. त्याचवेळी आजची परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.
परीक्षेपूर्वीच सुमारे ५० विद्यार्थांच्या हाती प्रश्‍नपत्रिका लागल्या होत्या, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, सदर प्रश्‍नपत्रिका कशी फुटली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रश्‍नपत्रिका काढण्याची पद्धतही अतिशय गुप्त असते. तीन प्राध्यापकांकडून प्रश्‍नपत्रिका हस्तलिखित तयार करून घेतले जाते. या तीनही प्रती गोवा विद्यापीठात आल्यानंतर कोणती प्रश्‍नपत्रिका परीक्षेच्या दिवशी मुलांना द्यावी, याचा निर्णय पेपर सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी घेतला जातो, असे प्रा. देवबागकर यांनी सांगितले. मात्र, या प्रकारामुळे आता ही पद्धतही पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments: