Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 8 January, 2011

श्रीराम मंदिरासाठी लढा सुरूच राहणार - सिंघल

रामनाथी येथे ‘विंहिप’ची बैठक
फोंडा, दि.७ (प्रतिनिधी)
अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामलल्ला मंदिरासाठी न्यायालयाच्या निकालानंतर मिळालेल्या लहान जागेत मंदिर होऊच शकत नाही. त्यामुळे तेथील संपूर्ण जमीन मंदिरासाठी मिळविण्यासाठी आंदोलन, संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही, अशी ग्वाही विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोकजी सिंघल यांनी आज (दि.७) सकाळी रामनाथी येथे दिली आहे.
रामनाथी फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानचा आवारात आयोजित विश्‍व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रन्यासी मंडळ व प्रबंध समितीच्या बैठकीचे समई प्रज्वलन करून उद्घाटन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. सिंघल बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय महामंत्री प्रवीण तोगाडिया, कार्याध्यक्ष वेदांतम्, संघटनमंत्री दिनेशजी, मधुभाई कुलकर्णी, कोषाध्यक्ष राघव रेड्डी, राजमाता चंद्रकांता देवी, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले, कोकण विभागाचे अध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, राजेंद्र गायतोंडे, दिलीप गायतोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. सिंघल म्हणाले की, संपूर्ण जगात हिंदूचा अपमान होत आहे. हिंदूचे सन्मानपूर्वक जीवन जगणे कठीण होत चालले आहे. विदेश आणि देशातही काही हिंदूंना आपल्या घरादारावर पाणी सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे. हिंदू समाजामध्ये संघटन शक्तीच्या अभावामुळे हिंदूंना ही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. हिंदूंकडे कुणाचीही बोट उचलून दाखविण्याची हिंमत होणार नाही. असा कणखर, बाणेदार हिंदू समाज निर्माण करण्याची नितांत गरज आहे. गुजरातमध्ये हिंदू समाज एकजूट व कणखर असल्याने त्यांच्याकडे बोट दाखविण्याची कुणाची हिंमत होत नाही.
न्यायालयाच्या निकालानंतर मंदिर निर्माण कार्याला पुन्हा गती प्राप्त झाली आहे. मात्र, छोट्या जागेत श्रीरामाचे मंदिर होऊ शकत नाही. देशभरात श्रीराम मंदिर निर्माणाच्या कार्याला गती मिळविण्यासाठी हनुमंत शक्ती जागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून हिंदूंना एकजूट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गावा गावातून अभियानाच्या माध्यमातून श्रीराम मंदिराबाबत जनजागृती केली जात आहे. श्री हनुमान जयंती, श्री राम नवमी कार्यक्रमाच्या माध्यमातून मंदिर निर्माण कार्याला गती देण्यासाठी उपक्रम होती घेतले जाणार आहेत, असेही श्री. सिंघल यांनी सांगितले.
हिंदू समाजात एकजूट, एकोपा निर्माण करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झालेली आहे. हिंदू समाजामध्ये मंत्र शक्तीच्या माध्यमातून आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केल्यास हिंदू समाज कणखर बनू शकतो. हिंदू समाज कणखर बनल्यास कोणत्याही शक्तीच्या विरोधात लढण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले.
राम मंदिर निर्माण आंदोलन हे फक्त मंदिर निर्माण करण्याचे आंदोलन नसून देशात एक कणखर हिंदू समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. श्रीराम जन्मभूमीबाबतच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे हिंदू समाजात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. संपूर्ण हिंदू समाजाच्या एकजुटीतून मंदिर निर्माणाचे कार्य केले जाणार आहे, असेही श्री. सिंघल यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे नेतेे मुस्लिमांची मते आणि सहानुभूती मिळविण्यासाठी हिंदू संघटनांवर खोटारडे आरोप करीत आहेत. हिंदूवर दबाव आणून त्यांना चिरडण्याचा कुटील डाव आहे, असा आरोप श्री. सिंघल यांनी केला.
परिषदेचा धर्म रक्षा निधी उभारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. संघाच्या विविध योजना मार्गी लावण्यासाठी निधीची गरज भासते. तसेच स्थानिक विभाग स्वावलंबी बनल्यास संघाच्या योजना मार्गी लावण्यात अडचणी येणार नाहीत. तसेच २०१४ साली संघाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने सुवर्ण महोत्सवी वर्षातील उपक्रम, कार्यक्रमावर चर्चा केली जाणार आहे. या सुवर्ण महोत्सवानिमित्त विदेशात आयोजित कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या कार्यात नवीन होतकरू तरुणांचा सहभागावर विचार केला जाणार आहे, असेही श्री. सिंघल यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेच्या तीन मोठ्या बैठका गोव्यात घेण्यात आल्याने परिषदेच्या गोव्यातील कार्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. गोव्यात हिंदू संस्कृती व संघटनात्मक कार्य हाती घेण्यात आले आहे. गोवा भूमी ही परशुराम भूमी आहे, असे अशोक चौगुले यांनी सांगितले.
सेवा विभागातील मधुकर दीक्षित यांनी सेवाविभागाच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणारी कविता राऊन हिने परिषदेच्या आश्रमात राहून शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. विश्‍व हिंदू परिषदेतर्फे चालविण्यात येत असलेल्या गोव्यातील महिला आश्रमाला सामाजिक सेवा पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, असे श्री. दीक्षित यांनी सांगितले.
महिला आश्रमाचे कार्य सांभाळणार्‍या जगन्नाथ मणेरीकर यांचा अशोकजी सिंघल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वेदमंत्राच्या घोषात दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर गौरीश तळवलकर यांनी ओंकार स्वरूपा हा अभंग सादर केला. बैठक आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप गायतोंडे यांनी स्वागत केले. कोकण विभागाचे अध्यक्ष देवकीनंदन जिंदाल यांनी प्रास्ताविक केले. सेवा विभागाच्या डॉ. अनिता तिळवे यांनी मान्यवरांची ओळख केली. सूत्रसंचालन दीपक गायकवाड यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन महेश बांदेकर यांनी केले. या बैठकीत देश आणि विदेशातील सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

No comments: