Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 6 January, 2011

राष्ट्रपतींचा किनारी फेरफटका व छायापत्रकारांना पोलिसी झटका

मडगाव, दि. ५ (प्रतिनिधी) : चार दिवसांच्या विश्रांतीसाठी गोव्यात खासगी भेटीवर आलेल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काल बाणावली किनार्‍यावर मारलेला फेरफटका आज राष्ट्रीय पातळीवर खमंग चर्चेचा विषय ठरला; पण त्याचे परिणाम यासंदर्भातील छायाचित्रे टिपलेल्या स्थानिक छायापत्रकारांना भोगावे लागत आहेत. स्थानिक पत्रकार संघटनांनी या छायाचित्रांबाबत सुरू झालेल्या पोलिस चौकशीस जोरदार आक्षेप घेताना सदर चौकशी म्हणजे वृत्तपत्रस्वातंत्र्यावर अतिक्रमण असल्याचा दावा करून ती तशीच सुरू राहिली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे .
राष्ट्रपतींनी काल आपल्या येथील मुक्कामांतील एक भाग म्हणून बाणावली येथील ताज एक्झॉटिका हॉटेलात कुटुंबीयांसमवेत दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम आखला होता . त्यानुसार त्यांच्या वाहनंाचा ताफा कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात हॉटेलात आला व नंतर त्या आणि काही मंडळी फेरफटका मारण्यासाठी हॉटेलजवळ असलेल्या किनार्‍यावर गेल्या.
त्यापूर्वी सकाळी १०-३० च्या सुमारास सुपरस्टार अमिताभ बच्चन आपल्या नातीला घेऊन जलक्रिडा करीत असल्याचा संदेश आल्याने काही छायापत्रकार तेथे गेले व त्यांनी सुपरस्टारची छायाचित्रे घेतली.ते परतण्याच्या तयारीत असताना अमिताभसमवेत असलेल्या ताजच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अभिषेक व ऐश्वर्या लगेच जलक्रीडेसाठी येणार असल्याचे सांगितल्याने ते तेथेच थांबले. तोपर्यंत ११-३० वाजले व संपूर्ण किनार्‍यावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. छायापत्रकारांना तेथे पाहून पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर त्यांच्या जवळ आले व त्यांनी त्यांना राष्ट्रपती किनार्‍यावर येणार असल्याने संपूर्ण किनार्‍याची नाकेबंदी केली असल्याने सर्वांना २०० मीटर बाहेर जावे लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे ते त्यांनी सांगितलेल्या अंतरावर जाऊन थांबले.
नंतर राष्ट्रपती किनार्‍यावर आल्या त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय होते. तसेच तेव्हा काही विदेशी पर्यटकही सभोवताली होते. काहीजण छायाचित्रेही घेत होते ते पाहून छायापत्रकारांनी त्याबाबत पोलिस उपअधीक्षकांकडे विचारणा केली असता तसेचराष्ट्रपतींच्या सुरक्षाधिकार्‍यांकडून त्यांनी पास घेतलेला असल्याचे सांगितले , पण त्यावेळी तसा पास मिळविणे शक्य नसल्याने छायापत्रकारांनी पोलिसांनी आखून दिलेल्या २०० मीटर अंतरावरूनच मिळतील तशी छायाचित्रे घेतली. ती आज प्रसिद्ध झाल्याने देशभर खळबळ माजली; शिवाय राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही सवाल खडा झाला. कारण एका राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात राष्ट्रपतींच्या सभोवताली उघडयाबंब अवस्थेत विदेशी पर्यटक वावरत असल्याचे दृष्टीला पडले. राष्ट्रीय स्तरावर उमटलेल्या या प्रतिक्रियांमुळे सुरक्षा व्यवस्थेने आपणावरील जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्नांत छायापत्रकारांना लक्ष्य केले व अरविंद टेंगसे, सोयरू कोमरपंत व गणादीप शेल्डेकर या संबंधित छायाचित्रकारांना पोलिस स्टेशनवर पाचारण करून त्यांच्या जबान्या नोंदवल्या. किनार्‍यावर गेलेल्यांत रामनाथ पै या छायापत्रकाराचाही समावेश होता; पण त्याचे छायाचित्र प्रसिध्द न झाल्याने त्याची जबानी नोंदवली गेली नाही.
छायाचित्रे कुठून घेतली गेली, कोणते कॅमेरे त्यासाठी वापरले, राष्ट्रपतींची भेट खासगी स्वरूपाची असताना ती का घेतली गेली, असे सवाल त्यांना करण्यात आले.
नंतर झालेल्या दक्षिण गोवा पत्रकार संघटनेच्या बैठकीत या पोलिसी चौकशीचा निषेध करून वृत्तपत्र स्वातंत्र्यावर तो हल्ला असल्याचे प्रतिपादून त्याचा निषेध करण्यात आला. नंतर पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने उमेश गावकर यांची भेट घेतली असता किनार्‍यापासून २०० मी. बाहेरील सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडे असल्याने खबरदारीपोटी आपण या जबान्या नोंदविल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या या भूमिकेला छायापत्रकारांनी जोरदार विरोध दर्शवला. तसेच आम्हाला पुन्हा बोलावून सतावण्याचा प्रकार झाला तर तो सहन केला जाणार नाही असा इशारा छायापत्रकारांनी दिला .
दरम्यान राष्ट्रपतींची ही खासगी भेट होती तर त्यांनी अशा प्रकारे जाहीर फेरफटका कसा मारला, त्यांची छायाचित्रे घेण्यास मनाई होती तर संबंधितांनी छायाचित्रकारांना अगोदरच तशी कल्पना का दिली गेली नाही, की राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकाकडून आपल्या त्रुटीवर पांघरुण घालण्याच्या प्रयत्नात छायापत्रकारांना सतावले जात आहेत, असे सवाल केले जात आहेत.
कालच्याप्रमाणे आजही नातवंडांना जलक्रीडेचा मनमुराद आनंद लुटू देण्यासाठी राष्ट्रपती पुन्हा बाणावलीला येणार होत्या; परंतु ‘त्या’ छायाचित्राचा असा काही जबरदस्त परिणाम झाला की त्यांनी आजची भेट रद्द केली. त्यामुळे काल दिवसभरात एक बटाटवडा व पाव या शिदोरीवर दिवसभर सुरक्षेसाठी तैनात केल्या गेलेल्या सुरक्षा रक्षकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. मात्र विश्रांतीसाठीचा राष्ट्रपतींचाहा गोवा मुक्काम एका अर्थी वादळीच ठरला!

No comments: