Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 8 January, 2011

अनुसूचित जमातीची पुन्हा घोर फसवणूक

‘उटा’चे नेते प्रकाश वेळीप खवळले
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
‘एसटी’ आयोग व ‘एसटी’ कल्याण खाते ५ जानेवारी २०११पर्यंत कार्यन्वित करू, हे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ‘उटा’ संघटनेला दिलेले आश्‍वासन दुसरी मोठी थाप ठरली आहे. आपला शब्द पाळण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी एकार्थाने आपल्या कृतीतून ‘एसटी’ समाजाला डिवचण्याचाच प्रयत्न चालवला आहे. ‘एसटी’ समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय कॉंग्रेस सरकारकडून न्याय मिळणार नसेल, तर त्यासाठीही भूमिपुत्र तयार आहेत व लवकरच त्याची प्रचिती देऊ, असा कडक इशारा ‘युनायटेड ट्रायबल अलायन्स असोेसिएशन’ (‘उटा’) चे निमंत्रक प्रकाश वेळीप यांनी दिला आहे.
‘उटा’ संघटनेतर्फे १६ डिसेंबर २००९ रोजी पणजीत विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी सरकारकडून ताबडतोब ‘एसटी’ आयोग व ‘एसटी’ कल्याण खाते स्थापन करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाच्या पार्श्‍वभूमीवर केवळ नाममात्र आदेश जारी करून या समाजाची बोळवण करण्यात आली. सरकारच्या या कृतीविरोधात नव्याने आंदोलनाची तयारी करून २९ डिसेंबर २०१० रोजी पणजीत मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ‘उटा’ संघटनेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी आमंत्रित करून ५ जानेवारी २०११ पर्यंत ‘एसटी’ आयोग व ‘एसटी’ कल्याण खाते कार्यन्वित करण्याचे ठोस आश्‍वासन दिले होते. पूर्वीच्या आश्‍वासनाप्रमाणे आता हे आश्‍वासनही हवेत विरले आहे. या आश्‍वासनाबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने या समाजाचे नेते खवळले आहेत. ‘एसटी’ कल्याण खात्याचे कार्यालय सांतईनेज येथील सरकारी वसाहतीत स्थलांतर करण्यात आले आहे व ‘एसटी’ आयोगाबाबत कोणतीही पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. समाजकल्याण संचालक एन.बी. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले.
‘एसटी’ समाजाच्या या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून दाखवली जाणारी ही बेफिकिरी आता खरोखरच चिंतेचा विषय बनला आहे. खोटी आश्‍वासने देऊन सरकार या समाजाची मानहानीच करीत आहे, अशी टीका करून या सरकारला आंदोलनांची भाषा समजत असेल तर पुन्हा एकदा ‘एसटी’ समाजाला आपली ताकद दाखवणे भाग आहे. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत इथल्या भूमिपुत्रांवर ही परिस्थिती ओढवणे ही खरोखरच शरमेची गोष्ट आहे. भूमिपुत्र खवळला तर काय होईल याची प्रचिती लवकरच सरकारला येईल,असाही इशारा श्री. वेळीप यांनी दिला.

No comments: