Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 4 January, 2011

कॉंग्रेसच्या मानगुटीवर पुन्हा बोफोर्सचे भूत

-४१ कोटी जादा दिल्याचे उघड
-आयकर लवादाचा अहवाल


नवी दिल्ली, दि. ३
बोफोर्स गैरव्यवहार प्रकरणात कराराचे उल्लंघन करून सरकारने विन चढ्ढा व क्वात्रोचीला सुमारे ४१ कोटी रूपये अतिरिक्त लाटल्याचे आयकर लवादाला आढळून आल्यामुळे बोफोर्सचे भूत परत एकदा कॉंग्रेसच्या मानगुटीवर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध घोटाळ्यांच्या प्रकरणात अडकलेल्या कॉंग्रेस सरकारची लक्तरे या निर्णयामुळे देशाच्या वेशीवर टांगली गेली आहेत.
४१ कोटी रूपये स्वर्गीय विन चढ्ढा व इटलीचे व्यावसायिक ओटावियो क्वात्रोची यांना ‘होवित्झर’ बंदूक व्यवहाराअंतर्गत देण्यात आले होते व या उत्पन्नावरील कर त्यांनी भारतात भरणे आवश्यक होते, असे लवादाने म्हटले आहे.
याबाबतीत कोणतीच कारवाई न करता गप्प बसणे म्हणजे भारत हे सौम्य राष्ट्र आहे व येथे कोणीही दंड भरून कर कायद्याशी खेळू शकतो असा चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे लवादाने आपल्या ९८ पानी अहवालात म्हटले आहे.
आयकर खात्याविरूध्द चढ्ढाच्या मुलाने लवादाकडे खात्याच्या ५२ कोटी रूपयांच्या आयकर दाव्याबाबत आव्हान याचिका सादर केली होती. खात्याने १९८७-८८ व १९८८-८९ या दोन सालांसाठी छड्डाकडून ८५ लाख कर येणे असल्याचाही दावा केला होता.
कंत्राटातील दरापेक्षा कमी कमिशन बोफोर्सने द्यायला हवे होते, असे नमूद करताना लवादाने त्याउलट सरकारलाच अतिरिक्त ४१ कोटी रूपये देणे भाग पाडल्याचे म्हटले असून हा निधी चढ्ढा व क्वात्रोचीला दिला गेल्याचेही म्हटले आहे.
क्वात्रोची हे गांधी घराण्यातील अत्यंत जवळचे मानले जात होते. लवादाचा हा निर्णय अशावेळी आला आहे की ज्यावेळी कॉंग्रेस व केंद्र सरकार विविध घोटाळ्यांच्या गर्तेत सापडले आहे. या निर्णयामुळे कॉंग्रेसची उरलीसुरली लक्तरेही दिल्लीच्या वेशीवर टांगली गेली आहेत. सीबीआयने क्वात्रोचीविरूध्द गुन्हा नोंदविलेला असतानाही त्याने १९९३ भारत देश सोडला होता.
मेसर्स स्वेंस्का इंक, पनामा या कंपनीच्या नावे ३२.६६ कोटी रूपयांचे कमिशन दिले गेले ते छड्डा याला पोचले व ते जीनिव्हाच्या स्विस बँक कॉर्पोरेशनमध्ये जमा झाल्याचे लवादाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे ए. ई सर्व्हीसेस लिमिटेड व्दारा मायो असोसिएटस, एसए, जीनिव्हा येथील कंपनीला ८.५७ कोटी रूपये देण्यात आले. महत्वाचे म्हणजे या कंपनीचे खाते तत्पूर्वी केवळ पंधरा दिवस आधीच म्हणजे २० ऑगष्ट १९८६ रोजी उघडण्यात आले होते.

No comments: