Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 6 January, 2011

जगनमोहन यांची ‘वायएसआर पार्टी’

नवी दिल्ली, दि. ५ -
माजी खासदार जगनमोहन यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाला अर्ज सादर करून नव्या पक्षाची आज घोषणा केली. ‘वायएसआर पार्टी’असे पक्षाचे नाव असून, जगनमोहन यांचे काका वाय.व्ही.सुब्बारेड्डी यांनी आज त्यासंबंधातला अर्ज आयोगाला सादर केला. आपल्या कुटुंबाची उपेक्षा होत असल्याचे कारण देऊन जगनमोहन यांनी गेल्या महिन्यात कॉंग्रेस पक्ष सोडला होता.

केंद्रीय मंत्री अलगिरी
यांचा राजीनामा?
चेन्नई, दि. ५ ः २जी स्पेक्ट्रम प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ए. राजा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करून, केंद्रीय रसायन व खत मंत्री एम.के.अलगिरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने तामिळनाडूत खळबळ माजली. अलगिरी यांनी द्रमुकचे सरचिटणीसपदही सोडल्याचे वृत्त पसरले. या दोन्ही बातम्या चुकीच्या असल्याचे द्रमूक सूत्रांनी स्पष्ट केले असले तरी, करूणानिधी यांच्या कुटुंबातच या मुद्यावरून फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अलगिरी हे करूणानिधी यांचे पुत्र आहेत.

भ्रष्टाचारावर
आज अध्यादेश?
नवी दिल्ली, द. ५
गेल्या वर्षभरात उघडकीस आलेल्या विविध मोठ्या घोटाळ्यांमुळे अडचणीत आलेल्या केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने भ्रष्टाचार करणार्‍यांची चौङ्गेर नाकेबंदी करण्यासाठी अतिशय कठोर तरतुदी असलेला अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अध्यादेश उद्या गुरुवारीच जारी करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘लोकपाल’ नियुक्त करण्यात येणार असून, या लोकपालाला भ्रष्टाचाराच्या आरोपांत अगदी पंतप्रधानांपासून तर सनदी अधिकार्‍यांपर्यंत कुणाचीही चौकशी करण्याचे अधिकार राहणार आहेत.

सीबीआयकडून
कलमाडींची चौकशी
नवी दिल्ली, दि. ५
राष्ट्रकुल क्रीडा घोटाळाप्रकरणी सीबीआयने आज राष्ट्रकुल आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची कसून चौकशी केली. या स्पधर्ंेसंदर्भात काही विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्याच्या मुद्यावरही सीबीआयने कलमाडी यांच्याकडून सविस्तर जाणून घेतले.
मंगळवारी सीबीआयने कलमाडी यांना तपास संस्थेच्या मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, कलमाडी आज सकाळी दहा वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले. सुमारे अर्धा तास उशिरा सुरू झालेल्या या चौकशी प्रक्रियेत कलमाडी यांनी अनेक प्रश्‍नांची उत्तरे टाळण्याचाच प्रयत्न केला.


सुरेश वाडकर
यांना मातृशोक
मुंबई, दि. ५
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुरेश वाडकर यांच्या मातोश्री चिंगूबाई ईश्‍वरा वाडकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने सांताक्रुझ येथे राहत्या घरी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. चिंगूबाई मूळच्या कोल्हापूरच्या होत्या. त्यांना गाण्याची आवड होती. सुरेश वाडकर यांना गायक बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. चिंगूबाई यांनी त्यांना प्रोत्साहन दिले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि श्‍वास घेणे कठीण झाले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेणार्‍यांमध्ये ज्येष्ठ संगीतकार अरुण पत्की, गायक स्वप्नील बांदोडकर, गायिका साधना सरगम, अभिनेता अजिंक्य देव आदींचा समावेश होता.

No comments: