Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 4 January, 2011

गोव्यात सोन्याचे प्रचंड साठे

-पेडणे, तिसवाडी, सासष्टी सुवर्णभूमी
-डॉ. नंदकुमार कामत यांचे संशोधन


पणजी, दि.३ (प्रतिनिधी)- पेडणे ते तिसवाडी व सासष्टीच्या काही भागांत खोल भूगर्भात दुय्यम सुक्ष्मरूपी सुवर्णसाठे सापडल्याचा सनसनाटी दावा गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांनी करून एकच खळबळ उडवली आहे. विशेषतः फक्त गोव्यात आढळणार्‍या ‘सावर्डे’ नामक खडकाच्या खाली हे साठे संशोधनाअंती आढळून आले आहेत. राज्याच्या एकूण भूभागाच्या १५ टक्के भागात हा खडक आढळतो. याबाबतीत व्यापक संशोधन करून खोदाई केल्यास किमान ६०० ते १२०० अब्ज किमतीचे सुवर्णसाठे सापडू शकतात, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर गोव्यात ६० मीटर खाली खोदाई करण्यास बंदी घालण्याची शिफारस करणारा गुप्त अहवाल मुख्यमंत्री तथा खाणमंत्री दिगंबर कामत यांना पाठवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गोवा विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक व जैवतंत्रज्ञान प्रकल्पाचे मुख्य संशोधक म्हणून काम पाहणारे डॉ. नंदकुमार कामत यांनी आज येथे बोलावण्यात आलेल्या खास पत्रकार परिषदेत आपल्या १२ वर्षांच्या संशोधनाचा अहवाल खुला करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. राज्य सरकारने तात्काळ तज्ज्ञ तांत्रिक समिती स्थापन करून खोल भूगर्भ परिस्थितीचा अभ्यास करावा व नमुने गोळा करून संभावित सुवर्णसाठ्यांचा नकाशा तयार करावा, अशी शिफारस केल्याची माहितीही त्यांनी दिली. या संशोधनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर गोव्यातील भूवापर वर्गीकरण निकष बदलावे लागतील व त्याबाबत निर्बंध लादणे गरजेचे आहे. या शोधामुळे खडकाळ जमिनीचे भाव वधारण्याची शक्यता वर्तवून जोपर्यंत यादृष्टीने सखोल अभ्यास केला जात नाही तोपर्यंत खाणींना परवाने देण्यात येऊ नयेत, असेही त्यांनी राज्य सरकारला सुचवले आहे. या संशोधनाचा व्यापक पाठपुरावा सुरू आहे. भूगर्भशास्त्रज्ञ डॉ.चचाडी, लघूजैवतंत्रज्ञ डॉ.अहमद यांच्या सहकार्याने व सूक्ष्म वनस्पतीरूपी सुवर्णसाठे विभागाचे ऑस्ट्रेलियस्थीत प्रसिद्ध संशोधक डॉ. फ्रँक रिथ यांच्या मार्गदर्शनाखाली या संशोधनाचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.दरम्यान, या संशोधन काळात सापडलेल्या सूक्ष्म सुवर्णसाठ्याचे ४२ व्हिडिओ व २५४ छायाचित्रे ‘यूट्यूब’ व ‘पिकासावेब’ संकेतस्थळावर टाकण्यात आलेले आहेत.
गोवा ही सुवर्णभूमी आहे असे आपण म्हणतो. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत या संशोधनामुळे हा दावा सत्यात उतरला आहे, असेही डॉ.कामत म्हणाले. हे संशोधन गोवा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र प्रयोगशाळेत करण्यात आले व या कामात तांत्रिक साहाय्यक नेयसा रॉड्रिगीस, प्रियांका शिरोडकर, इंदिरा तळावलीकर आदींचे सहकार्य लाभल्याची माहितीही त्यांनी दिली. या कामाला विद्यापीठ अनुदान आयोग व मेसर्स आर.एन.एस बांदेकर ऍण्ड ब्रदर्स यांची मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आशिया खंडातील पहिले संशोधन
सुक्ष्मजंतूरूपी सुवर्णसाठ्यांचा शोध घेणारे हे गोवा, भारत व एकूण आशियातील पहिले संशोधन ठरल्याचा दावा डॉ.कामत यांनी केला आहे. खडकाळ भूगर्भाखालील अशा पद्धतीचे सूक्ष्म सुवर्णसाठे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.या संशोधनाचा अभ्यास करताना भूगर्भातील झिरकोनियम,हाफनियम,युरेनियम व थोरीयम साठ्यांचा शोध लागणार आहेच पण त्याचबरोबर हजारो वर्षांत घडलेल्या वातावरण बदलाचाही शोध लागणार आहे. प्रत्यक्ष समुद्र पातळीखाली हे सुक्ष्मरूपी सुवर्णसाठे विविध आकारात सापडले आहेत. कुणाही सर्वसामान्यांना हे साठे सापडणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण देताना भूगर्भाच्या ६५ मीटर व त्याखाली खोदाई करणे मोठे जिकिरीचे व खर्चिक काम असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे,असेही ते म्हणाले.

No comments: