Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 5 January, 2011

१३ व १४ रोजी नव्याने परीक्षा

पेपर फूटल्याचे प्रकरण
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - ‘एमबीबीएस’च्या शेवटच्या वर्षाचे पेपर फुटल्याचे गोवा विद्यापीठ समितीच्या चौकशीत उघड झाले आहे. मात्र, कशा पद्धतीने हे पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पेपर फुटीनंतर पुढे ढकलण्यात आलेला जनरल मेडिसीन पेपर १ आणि २ हे येत्या दि. १३ आणि १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळी घेण्यात येणार असल्याचे आज गोवा विद्यापीठाचे साहाय्यक कुलसचिव आर आर. भाटीकर यांनी सांगितले.
शेवटच्या वर्षाच्या पेपर फुटीमुळे एक प्राध्यापक ‘डायरेक्टर’ अडचणीत आला असून सध्या त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राध्यापकांच्या दोन गटांत असलेल्या शत्रुत्वातून हे प्रकरण उघडकीस आले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
गेली चार वर्षे सतत वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षेत किंवा विद्यार्थ्यांच्या गुणात गौडबंगाल होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आले होते. यासंदर्भात खुद्द महाविद्यालयाच्या डीनवर आरोप झाला होता. त्यानंतर, परीक्षेत कॉपी करताना दोन विद्यार्थीनींना पकडण्यात आले होते. या दोन्ही मुली डॉक्टरांच्या असल्याचे नंतर उघड झाले होते. त्याचप्रमाणे, विद्यापीठातून गुणपत्रिका आल्यानंतर एका विद्यार्थ्याचे गुण वाढवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या क्रमांकावर असलेला विद्यार्थी मागे जाऊन त्याच्या जागी आपल्या मर्जीतल्या एका विद्यार्थ्यांना पुढे आणण्यात आले होते. त्याचप्रमाणे, दोन डॉक्टरांच्या मुलांनी उत्तर पत्रिकेवर प्रश्‍नपत्रिका तपासणार्‍या शिक्षकाला समजण्यासाठी विशेष चिन्ह करून ठेवल्याचे उघडकीस आले होते.
या सर्व प्रकारांमुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात घेतल्या जात असलेल्या परीक्षा पद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या वर्षापासून पदव्युत्तर प्रवेशासाठी समान प्रवेश प्रवेश परीक्षेचा निर्णय झाला होता. परंतु, काही डॉक्टरांचीच मुले या वर्षी असल्याने हा समान प्रवेश परीक्षेचा निर्णय रद्द करून पुढील वर्षापासून ही पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

No comments: