Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 5 January, 2011

वास्कोत दिवसाढवळ्या चोरी

पत्रकाराने पकडला चोर
वास्को, दि. ०४ (प्रतिनिधी)- शहरातील चोरी प्रकरणामुळे हैराण झालेल्या पोलिसांना आज पुन्हा धावपळ करण्याची वेळ आली होती, मात्र एका जागृत पत्रकारामुळे हे संकट टळले. आज दिवसाढवळ्या एका फ्लॅटमधून मालमत्ता लंपास केल्यानंतर फरार झालेल्या चोरट्याला सुरेंद्र मडकईकर या पत्रकाराने रस्त्यावर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, त्याच्याकडून चोरीला गेलेले काही सामान जप्त करण्यात आले. यापूर्वी वास्कोतील अन्य दोन पत्रकारांनी चोरीच्या प्रकारातील आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले होते .
वास्कोच्या सेट ऍन्ड्रु चर्चसमोर असलेल्या‘सोनिया अपार्टमंट’ इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर राहणारा बलवंत सैनी व त्याचे कुटुंब दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी बाहेर गेले. यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा घरी परतले असता फ्लॅटच्या दरवाजाची तीनही कुलुपे तोडून अज्ञातांनी आत प्रवेश केल्याचे बलवंत व त्याच्या मुलाच्या बायकोला नजरेस आले आणि आत प्रवेश केल्यावर दोन अज्ञात इसम त्यांना घरात दिसले. घरात चोरांनी प्रवेश केल्याचे समजताच त्यांनी हालचाल करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी या अज्ञात चोेरट्यांनी हत्यारांचा धाक दाखवून येथून पोबारा केला. सदर चोरट्यांनी पलायन केल्यानंतर बलवंत व त्याच्या मुलाच्या बायकोने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता, रस्त्यावरील काही लोकांनी या चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र तोपर्यंत सदर चोरटे गायब झाले. मात्र ज्यावेळी सदर चोर पळत होते तेव्हा एका चोरट्यावर पत्रकार सुरेंद्र मडकईकर यांची नजर गेली व त्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याक्षणी फायदा झाला नाही. काही वेळानंतर सुरेंद्र हा शहरात असलेल्या ‘चेझ’ इमारतीसमोरून जात असताना चोरीत असलेला एक चोर येथे मोबाईलवर बोलत असल्याचे त्याच्या नजरेस येताच त्यांनी त्याला पकडून वास्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. वास्को पोलिसांंच्या माहितीनुसार आज फ्लॅटमध्ये सदर चोरी प्रकरणातील पकडण्यात आलेल्या या चोरट्याचे नाव प्रेमचंद रामसुरत मिश्रा (वय २७) असे असून तो राजस्थान येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या चोरी प्रकरणातील दुसरा चोरटा सापडलेला नसल्याचे पोलीसांनी सांगून लवकरच तो गजाआड होणार अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. दरम्यान ह्या चोरट्यांनी सैंनी ह्या निवृत्त नौदलाच्या अधिकार्‍याच्या घरातून सुमारे ७७ हजाराची मालमत्ता लंपास केली होती अशी माहिती पोलीसांनी देऊन पकडण्यात आलेल्या चोरट्याकडून २५ हजाराची मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चोरीला गेलेले इतर सामान दुसर्‍या चोरट्याकडे असणार असा संशय वास्को पोलिसानी व्यक्त केला आहे. निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

No comments: