Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 February, 2011

पोलिस मालखान्यातूनच अमली पदार्थाची विक्री

राज्य सरकारचे सीबीआयला पत्र
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): निलंबित पोलिस अधिकारी सुनील गुडलर पोलिस मालखान्यातील अमली पदार्थाची विदेशी लोकांना विक्री करीत होता, असे केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) कळवण्यात आले आहे. राज्य सरकारने सीबीआयला लिहिलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकातील तत्कालीन उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्या स्टिंग ऑपरेशननंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. सदर स्टिंग ऑपरेशन ड्रग माफिया दुदू याची बहीण आयाला व प्रेयसी झरिना यांनी केले होते.
राज्याचे मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव यांनी दि. ३१ जानेवारी रोजी सीबीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी या प्रकरणाचे तपासकाम करण्यासाठी सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे. पोलिस ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणात राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचीही माहिती या पत्रात देण्यात आली आहे. या प्रकरणात गेल्या वर्षी निलंबित करण्यात आलेल्या सात पोलिसांशी सुनील गुडलर याचे लागेबांधे असल्याचेही म्हटले गेले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आत्तापर्यंत या प्रकरणात गृहमंत्री रवी नाईक यांचा पुत्र रॉय याच्या नावाचाही उल्लेख येत आहे. तर, नाईक यांनी ‘तो’ रॉय आपला मुलगा नसल्याचे स्पष्ट केले असून तो रॉय फर्नांडिस असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीतून आता कोणता ‘रॉय’ समोर येतो याकडे गोव्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

No comments: