Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 February, 2011

टाक्या घोटाळा प्रकरणी चर्चिल विरोधात तक्रार

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): सरकारी योजना तयार न करता मतदारांना भुलवण्यासाठी पाण्याच्या टाक्या वाटून ९७.७३ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा करून सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव तसेच खात्याचे प्रधान मुख्य अभियंता व कनिष्ठ अभियंत्याच्या विरोधात भ्रष्टाचाराची व गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली आहे. दक्षता विभाग, गुन्हा अन्वेषण विभाग व पर्वरी पोलिस स्थानकावर ही तक्रार देण्यात आली आहे.
कुडचडे येथील प्रदीप काकोडकर, मडगाव येथील प्रशांत नाईक व पणजी येथील डॉ. केतन गोवेकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची नोंद करून न घेतल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा तक्रारदारांनी दिला आहे. गोवा विधानसभेत या घोटाळ्यावर प्रचंड गदारोळ माजला होता. फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी केलेल्या या घोटाळ्याचा गौप्यस्फोट केला होता.
वर्तमानपत्रांत छापून आलेल्या घोटाळ्याच्या वृत्तावरून तक्रारदारांनी ही तक्रार केली आहे. चर्चिल आलेमाव, प्रधान अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. सरकारची कोणतीही मान्यता न घेता सरकारी तिजोरीतून लाखो रुपये उचलण्यात आले आहेत. या पाण्याच्या टाक्या केवळ आपल्या मतदारसंघातील मतदारांना खूष करण्यासाठीच दिल्या गेल्या असून सरकारी पैशांचा हा दुरुपयोग असल्याचेही तक्रारदारांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप या तक्रारीची नोंद करून घेतली नसल्याचे समजते.

No comments: