Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 February, 2011

नवविवाहित जोडपे आगीत भाजल्याने गंभीर

आत्महत्येचा प्रयत्न की घातपात; संभ्रम कायम
वास्को, दि. ४ (प्रतिनिधी): आठ महिन्यांपूर्वी निकाह झालेले हीना व मेहबूब तोरगल नावाचे मंगोरहील, वास्को येथे राहणारे जोडपे आज (शुक्रवारी) सकाळी आगीत गंभीररीत्या भाजलेले आढळल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर सुरू असून या जोडप्याने आत्महत्येचा प्रयत्न केला की हा घातपाताचा प्रकार आहे, याचे कोडे अद्याप वास्को पोलिसांना उलगडलेले नाही.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९.३० च्या सुमारास सदर घटना घडली. मंगोरहील येथील मारुती मंदिराच्या मागे असलेल्या भाड्याच्या खोलीत राहणारा मेहबूब (वय २८) व त्याची पत्नी हीना (वय २०) आगीत गंभीररीत्या भाजल्याची खबर वास्को पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आगीत हीना ७० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे तर मेहबूब ३० टक्के भाजला गेला आहे. पोलिसांना घटनास्थळी केरोसीनचा एक गॅलन सापडला असून त्यातील तेल अंगावर ओतून आग लावण्यात आल्याचे दिसून आले. हीना जबानी देण्याच्या परिस्थितीत नसल्याने सदर प्रकार आत्महत्येचा आहे की यामागे कोणता घातपात आहे याबाबत अजून निश्‍चितपणे सांगता येणार नाही, असे वास्को पोलिस उपनिरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मेहबूब व हीना यांचा निकाह आठ महिन्यांपूर्वी झाला होता व ते दोन महिन्यांपूर्वीच या खोलीत राहण्यासाठी आले होते. दरम्यान, खोलीचे मालक परशुराम बेलगर यांच्याशी संपर्क साधला असता केला असता आज सकाळपासून पती-पत्नीत कुठल्या तरी विषयावरून वाद होत असल्याचा आवाज ऐकू येत होता असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ९.३० च्या सुमारास अंगाला आग लागल्याच्या अवस्थेत मेहबूब आरडाओरडा करीत खोलीबाहेर आला. आपण व वीरेश नावाच्या अन्य एका इसमाने ती आग विझवली असेही ते म्हणाले. त्यानंतर खोलीत जाऊन पाहिले असता मेहबूबची पत्नी आगीत गंभीररीत्या भाजलेली आढळून आली. याबाबत आपण लगेच वास्को पोलिस व १०८ रुग्णवाहिकेला कळवल्याचे श्री. बेलगर म्हणाले. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फिलोमिना कॉस्ता ह्या प्रकाराचा तपास करीत आहेत.

No comments: