Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 February, 2011

भर अधिवेशन काळात आराडी - सुकूर येथे सशस्त्र दरोडा

पर्वरी, दि. १ (प्रतिनिधी) - पर्वरी पठारावर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच आराडी - सुकूर येथील घरावर सहा जणांच्या टोळीने चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा घातल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून यात सुमारे ६ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची तक्रार मारिया कॉलिन लिसबांव यांनी पर्वरी पोलिस स्थानकात नोंदवली आहे.
आज पहाटे ४.३० ते ६ या दरम्यान या दरोडा पडला. या घटनेमुळे पर्वरी भागात भीतीचे वातावरण पसरले असून अधिवेशन काळात घडलेली ही घटना म्हणजे पोलिसांच्या आणि पर्यायाने गृहखात्याच्या निष्क्रियतेचे आणखी एक उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया येथे व्यक्त झाल्या आहेत. पर्वरी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात भा. दं. सं. ३९५ व ३९७ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
या विषयीचे सविस्तर वृत्त असे की, दि. १ फेब्रुवारीच्या पहाटे २५ ते ३५ वयोगटातील दरोडेखोरांनी पर्वरी येथील मारिया हिच्या घरात प्रवेश केला. घराचा मागील दरवाजा तोडून सुमारे ६ तरुण आतमध्ये घुसले. आवाजाने घरात झोपलेल्या सदस्यांना जाग आली व मारिया यांनी त्यांना विरोध केला. यावेळी त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर अवजड हत्याराने वार करून पिस्तुलाचा धाक दाखवण्यात आला. त्यानंतर दरोडेखोरांनी सॅमसंग एलसीडी टीव्ही, लियोनार लॅपटॉप, नोकिया मोबाईल संच असे मिळून सुमारे ६ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सदर दरोड्याची माहिती मुरारी शेट्टी यांनी पर्वरी पोलिसांनी दिली. त्याबरोबर पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सगुण सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञ आणि श्‍वान पथकाची मदत घेण्यात आली. या विषयीचा अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड करीत आहेत.

No comments: