Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 31 January, 2011

विरोधकांबरोबरच सत्ताधारी आमदारही आक्रमक!

-आजपासून विधानसभा अधिवेशन
-ड्रग्ज, इस्पितळाचा प्रश्‍न गाजणार


पणजी, दि. ३० (प्रतिनिधी )
विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड सुरू असतानाच उद्या ३१ पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनासाठी विरोधक आक्रमक बनले आहेत. सत्ताधारी पक्षातीलही काही आमदार आपल्याच सरकारवर तुटून पडण्यास पुढे सरसावले असून हिवाळी अधिवेशन असतानाही सरकारला चांगलाच घाम फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
उद्या सकाळी ११.३० वाजता राज्यपाल एस. एस. सिद्धू यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल. या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, सरकारचे अपयश सभागृहासमोर मांडण्यासाठी विरोधी भाजपने पूर्णपणे तयारी केली आहे. ड्रग्ज विषयावर राज्यपाल आपल्या अभिभाषणात कोणती भूमिका मांडतात हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री रवी नाईक यांनी ड्रग्ज प्रकरणी भाजपवर टीका केल्याने त्याचेही पडसाद या अधिवेशनात उमटणार आहेत.
या अधिवेशनात सुमारे ९०० हून जास्त प्रश्‍न आले असले तरी प्रत्यक्षात चार दिवस चालणार्‍या या अधिवेशनात किती प्रश्‍न चर्चेला येतील हेच पाहावे लागणार आहे. विरोधक आक्रमक बनले असतानाच खुद्द आघाडीतील धुसफुस व सरकार पक्षातील काही आमदारांनी उघड बंडाची घेतलेली भूमिका मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. हळदोण्याचे आमदार ऍड.दयानंद नार्वेकर तसेच कुठ्ठाळीचे आमदार तथा उपसभापती माविन गुदिन्हो हे सरकारवर नाराज असल्याने ते देखील सरकारवर तोंडसुख घेतील, याची भीतीही सरकारला लागून राहिली आहे. बेकायदा खाण व्यवसाय, सरकारी इस्पितळांचे खाजगीकरण, ड्रग्ज प्रकरण हे प्रमुख मुद्दे राहणार आहेत.
आघाडी सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील विधिमंडळ गटात थेट फूट पडल्याने त्याचेही पडसाद या अधिवेशनात दिसणार आहेत. विधिमंडळ नेतेपद व मुख्य प्रतोदपदाचा विषय सभापती राणे यांच्याकडे प्रलंबित असल्याने राष्ट्रवादीचे आमदार विविध ठरावांवेळी काय भूमिका घेतात हे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. या अधिवेशनात गोवा पोलिस कायदा विधेयक सादर होणार असल्याची शक्यता आहे. या विधेयकावर सार्वजनिक चर्चा व्हावी, अशी मागणी विविध गटांनी केली आहे व त्यामुळे हे विधेयक सहजपणे संमत होणे कठीणच आहे. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचा विषयही या अधिवेशनात गाजणार आहे. प्रस्तावित महामार्गाबाबत सरकारला आपली ठोस भूमिका स्पष्ट करणे भाग पडणार आहे. अनुसुचित जमातीबाबत सरकारच्या बेफिकीर वृत्तीचा चांगलाच समाचार घेण्याचे आमदार रमेश तवडकर यांनी ठरवले आहे. यानिमित्ताने भूमीपुत्रांचा रूद्रावतारच ते धारण करण्याची शक्यता असून आदिवासींना दिलेल्या खोट्या आश्‍वासनांचा ते पर्दाफाश करणार आहेत.

No comments: