Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 31 January, 2011

पुरावे असल्यास गृहमंत्री कारवाई का करीत नाहीत? - आर्लेकर

-रवींच्या राजीनाम्याची भाजपची मागणी

‘रॉय’ला उजेडात आणा
(अग्रलेख पान ६ वर)


पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) ः गृहमंत्री रवी नाईक हे वायफळ बडबड करीत असून बेजबाबदार वक्तव्ये करायला लागले आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल संशय निर्माण झाला आहे. गृहमंत्रिपदासाठी ते पात्र नाहीत, अशी टीका करीत त्यांनी गृहमंत्रिपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आज भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केली. तसेच, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यावर काल गृहमंत्र्यांनी केलेल्या बेजबाबदार आरोपाचा त्यांनी तीव्र निषेध केला. पुरावे असल्याचा दावा करणारे रवी नाईक ‘रॉय’वर कारवाई करण्यास का धजत नाहीत, असा प्रश्‍न आर्लेकर यांनी विचारला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
गृहमंत्री नाईक यांच्या आरोपात तथ्य असेल आणि पर्रीकर यांनी कोणत्याही ड्रग व्यवहाराशी संबंध असलेल्या व्यक्तीला आपल्याकडे आश्रय दिला असेल तर पुढील कारवाई त्यांनी अवश्य करावी, असे जाहीर आव्हान आर्लेकर यांनी दिले.ही कारवाई करण्यासाठी गृहमंत्री नाईक यांचे हात कोणी बांधले आहेत, तर त्यांचीही त्यांनी नावे उघड करावी, असे श्री. आर्लेकर यावेळी म्हणाले.
राज्याची अर्ंतगत सुरक्षा पूर्णपणे कोलमडून पडली आहे. गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बेजबाबदार वक्तव्य करणे हे गृहमंत्रिपदावरील व्यक्तीला शोभत नाही. गृहमंत्री आणि ‘रॉय’ या नावाबद्दल गोव्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर त्यांनी जनतेसमोर उघडपणे येणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, सरकारनेही यावर स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे श्री. आर्लेकर म्हणाले. पोलिसांना रॉय फर्नांडिस याच्या विरोधात पुरावे मिळाले आहे तर आतापर्यंत त्याच्याविरुद्ध कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्‍न करून एका ‘रॉय’ला वाचवण्यासाठी दुसर्‍या ‘रॉय’चा बळी देण्याचाच हा प्रयत्न असल्याचीही शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. रॉय फर्नांडिस याच्या विरोधात पुरावे सापडले असतील तर गृहमंत्र्यांनी हे पत्रकार परिषद घेऊन सांगावे लागते, यातच सर्व काही दडलेले आहे, असा टोमणाही यावेळी आर्लेकर यांनी हाणला.
ड्रग प्रकरण तीन महिन्यांपूर्वीच ‘सीबीआय’ला दिल्याचा हा प्रकार पूर्णपणे बनवाबनवीचा आहे. तीन महिन्यांपूर्वी हे प्रकरण सीबीआयला दिले होते तर याची माहिती का उघड केली नाही, असा प्रश्‍न करून राज्याच्या मुख्य सचिवांनी यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. गृहमंत्र्यांवर आमचा विश्‍वास नाही असे सांगत संदीप चिमूलकर हा भाजपचा सदस्य नसल्याचेही श्री. आर्लेकर यांनी सांगितले. एकेकाळी रवी नाईक मात्र भाजपचे सदस्य होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही बेटे नौदलाला सोपवा
गोव्यात सुरक्षेच्या दृष्टीने नौदलाचा पाया भक्कम असणे ही काळाची गरज असल्याने भारतीय जनता पक्ष ‘ग्रांद’ आणि ‘पिकेन’ ही दोन्ही बेटे नौदलाच्या स्वाधीन करण्याच्या बाजूने असल्याचे आज पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यसभा खासदार शांताराम नाईक आणि कॉंग्रेसचे दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांनी हा विषय धार्मिक आणि राजकीय करून लोकांची दिशाभूल करू नये, असा सल्लाही आर्लेकर यांनी त्यांना दिला. या बेटाबाबत या दोन्ही खासदारांनी अनावश्यक प्रश्‍नचिन्ह निर्माण केले असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
वास्को येथील ग्रांद आणि ‘पिकेन’ ही दोन्ही बेटे नौदलाने आपल्या ताब्यात घेण्याची तयारी चालवली आहे. यातील एका बेटावर क्रॉस आहे तर दुसर्‍यावर तुळस आहे. मात्र ही बेटे नौदलाच्या ताब्यात देण्यास या दोन्ही खासदारांनी विरोध केला आहे. तसेच नौदल ख्रिश्‍चनाच्या विरोधात वावरत असल्याची टीका करून या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी श्री. आर्लेकर यांनी केला. मुंबई येथे झालेला २६-११ चा हल्ला पाहिल्यास ही दोन्ही बेटे नौदलाच्या ताब्यात असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप सुरक्षेचा विचार करून नौदलाच्या बाजूने उभे राहणार असल्याचे श्री. आर्लेकर यांनी यावेळी सांगितले.

No comments: