Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 February, 2011

अंगणवाडी कर्मचारी आक्रमक सलग चौथ्या दिवशी राजधानीत धडक

रास्ता रोको, घोषणांनी पणजी दणाणली
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): राज्यभरातून आलेल्या सुमारे २,२०० अंगणवाडी शिक्षिका व सेविकांनी आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्या करताना शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी पणजीत जोरदार धडक दिली.
या कर्मचार्‍यांनी आज प्रथम महिला व बाल कल्याण संचालनालयाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा नेला व तेथे संचालक संजीव गडकर यांना निवेदन दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक देण्यासाठी निघाल्या असता पोलिसांनी त्यांना चर्च चौकात अडवले. त्यामुळे संतापलेल्या या हजारो महिलांनी तेथेच बैठक मारून रस्ता रोखून धरला. रात्री उशिरापर्यंत त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते.
गोव्यातील एकूण १२६२ अंगणवाडी केंद्रांवरील शिक्षिका व सेविका यांनी गेली २० वर्षे आपणास सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी व त्याप्रमाणे सर्व सवलती दिल्या जाव्यात अशी सरकारकडे मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. मात्र सरकारने आजवर त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे आता निर्णायक लढा उभारण्याचा चंग या अंगणवाडी कर्मचार्‍यांनी बांधला असून दि. १ फेब्रुवारीपासून या महिला पणजीत येऊन आंदोलन करत आहेत. आज आक्रमक घोषणा देत त्यांनी राजधानी दणाणून सोडली.
पर्रीकरांनी भेट घेतली
गेल्या चार दिवसांपासून गोव्याच्या कानाकोपर्‍यांतून पणजीत येऊन आंदोलन करणार्‍या या हजारो महिलांची आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी भेट घेतली व त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
केंद्रीय योजना असल्यामुळे मागण्या मान्य होण्यास अडचणी : गडकर
अंगणवाडी ही केंद्राची योजना असून या महिलांसाठी गोवा सरकारने शक्य तेवढे सर्व काही केले आहे. गतवर्षी त्यांच्या मानधनातही वाढ केली असून इतर राज्यांच्या मानाने या कर्मचार्‍यांना गोव्यात जास्त मानधन देण्यात येते, अशी माहिती महिला व बाल कल्याण संचालनालयाचे संचालक संजीव गडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिली.

No comments: